गेल्या आठवडय़ात तामिळनाडू, आंध्र प्रदेशात उठलेल्या ‘नीलम’ चक्रीवादळाचा प्रभाव आता थांबल्याने विदर्भात थंडीला सुरुवात झाली असून यंदाची दिवाळीही गुलाबी थंडीत घालविण्याचा आनंद विदर्भवासीयांना घेता येईल.
यंदाच्या अधिक महिन्यामुळे भाद्रपदनंतरचे सर्वच सण-उत्सव एक महिना पुढे लांबले आहेत. पावसानेही परतीचा प्रवास लांबविला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पाऊस सुरू होता.
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर थंडीला सुरुवातही झाली होती. दुपारी थोडे उन्हाचे चटके आणि रात्री थंडी, असे वातावरण असतानाच पुन्हा नैसर्गिक बदल झाल्याने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामुळे विदर्भात नागपूरसह काही ठिकाणी पाऊस झाला.
हवेत बाष्पाचे प्रमाण वाढल्याने थंडी पळाली, पण आता ‘नीलम’ चक्रीवादळाचा प्रभाव थांबल्याने विदर्भात थंडीला सुरुवात झाली आहे. हुडहुडी भरावी एवढी थंडी अजून नसली तरी गुलाबी थंडीचा आनंद दिवाळीत मिळणार आहे. विदर्भात पारा दिवसेंदिवस खाली घसरत असल्याचे आठवडय़ातील आकडेवर नजर टाकली असता स्पष्ट होते.
तापमान, पाऊस, आद्र्रता, सूर्यप्रकाशाचा कालावधी, हवेचा दाब, बाष्पीभवनाचा वेग यामुळे वातावरणात बदल होतो. सोमवारी नागपूरचे कमाल तापमान ३१.१ अंश सेल्सिअस, तर किमान १८.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
मंगळवारी नागपूरचे कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सिअस, तर किमान १६.३ अंश सेल्सिअस होते. विदर्भात पुढील दोन दिवस वातावरण कोरडे राहील आणि थंडी वाढू लागेल, असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान कार्यालयाने व्यक्त केला.
बुधवारी नागपूरचे कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सिअस, तर किमान १५.६ अंश सेल्सिअस होते. विदर्भात अकोल्यात सर्वाधिक कमाल तापमान ३२.९नोंदविण्यात  आले.   

Story img Loader