उन्हाची काहिली वाढायला सुरुवात होताच घरोघरी, सरकारी व खासगी कार्यालयात अडगळीत ठेवण्यात आलेले कूलर बाहेर निघू लागले असून त्यासाठी लागणाऱ्या खस आणि वूडवूलच्या ताटय़ा बाजारात विक्रीला आल्या आहेत. तापमान वाढू लागल्यामुळे घरोघरी कूलर लावले जात आहेत.  
कूलरला लावण्यात येणाऱ्या ताटय़ा शहरातील विविध भागात विक्रीला आहेत. यावर्षी होळीच्या आधीच उन्हं जाणवायला लागल्यामुळे लोकांनी अडगळीत ठेवलेले कूलरही लवकर बाहेर काढले. कूलरची साफसफाई करून त्याला नवीन ताटय़ा बसविण्याचे काम केले जात आहे. विधानभवन परिसरात, महाराज बाग, वर्धा मार्ग, सक्क रदरा, गोकुळपेठ, महाल, इतवारी या भागात मोठय़ा प्रमाणात खसच्या ताटय़ा विकणारे दिसून आले. दरवर्षी उन्हाळ्यात दिसणारे खस विक्रेते साधरणत: फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात मिळेल त्या जागेवर दुकाने थाटून बसतात आणि त्यानंतर जवळपास दोन महिने त्यांचा हा व्यवसाय सुरू असतो.
विधानभवन परिसरात खस आणि वुडवुलची दुकाने थाटण्यात आली आहेत. मेकोसाबागमधील कमलाबाई बेहरे यांनी सांगितले, दिवाळीनंतर खस आणि वुडवुलच्या ताटय़ा तयार करण्याचे काम करीत असतो. पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे घरातील सर्वजण या व्यवसा़ात सहभागी होत असतात. नागपुरात विविध ठिकाणी दुकाने लावण्यात आली आहे. फूटपाथवर ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या जागेवर दुकान लावत असतो. मात्र, अनेकदा पोलीस त्रास देत असतात. फूटपाथवर दुकान लावण्यासाठी महापालिका परवानगी देत नाही. त्यामुळे मिळेल त्या जागेवर दुकाने थाटावी लागतात. १५० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत त्याची विक्री केली जाते. खसपेक्षा वुडवुलच्या ताटय़ा महाग आहेत. भंडारा आणि गोंदियामधून खस आणत असतो. एक्झॉस्ट आणि सेमीएक्झॉस्ट कूलरच्या ताटय़ा हव्या त्या आकारात तयार केल्या जातात. ग्राहकांची मागणी असेल त्या आकारात ताटय़ा तयार करण्याचे काम केले जाते. कूलरच्या ताटय़ाशिवाय दरवाज्याचे पडदे तयार केले जात असून ते १०० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत विक्रीला आहेत. अनेक लोक जुन्या ताटय़ा वापरून काम निभावत असतात. साधारणत: दोन वर्षांनंतर अनेक लोक नवीन ताटय़ा खरेदी करीत असतात. सरकारी व निमसरकारी कार्यालयात मोठय़ा प्रमाणात ताटय़ाची खरेदी केली जात असल्याचे बेहरे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा