राजकारण्यांच्या कच्छपी लागलेल्या गोविंदा मंडळांच्या म्होरक्यांमुळे गोविंदाच्या उत्सवाचे बाजारीकरण झाले आणि त्यातूनच उंच थरांच्या हव्यासापोटी या मंडळींना गोविंदाची सुरक्षा धोक्यात आणली आणि त्यातूनच दहीहंडीत जीवघेण्या अपघातांची मालिका सुरू झाल्याची कुजबूज गोविंदा पथकांमध्ये सुरू झाली आहे. त्यातच मुंबईतील समस्त दहीहंडी पथकांना एका छत्राखाली आणल्याची टीमकी वाजवत उंच थरांचा आग्रह धरणाऱ्या दहीहंडी समन्वय समितीमुळेच अपघातांचे प्रमाण वाढल्याची टीका गोविंदांमध्ये मानाचे स्थान असलेले जुने-जाणते गोविंदा प्रशिक्षक अनंत सावंत यांनी केल्याने गोविंदांच्या मनातील असंतोषाला वाचा फुटली आहे. केवळ गोविंदा पथकांची नोंदणी करून घेण्यापुरते ही समिती काम करत असल्याचे असल्याचे ताशेरेही त्यांनी ओढले आहेत.
दहीहंडी समन्वय समितीकडे मुंबईतील १५०० गोविंदा पथकांची नोंदणी झाल्याचा ढोल समन्वय समिती पिटत आहे. मात्र समितीचा एकही पदाधिकारी या गोविंदा पथकांपर्यंत पोहोचलेला नाही. नोंदणी झालेली ही पथके नेमक्या कोणत्या विभागातील आहेत, पथकात किती गोविंदा आहेत, त्यात बाल गोविंदांचा सहभाग किती आहे, ते कोठे सराव करतात, किती थर रचण्याची त्यांची क्षमता आहे, त्यांचे प्रशिक्षक कोण आदी माहिती समन्वय समितीने गोळा करायला हवी होती. समितीच्या स्थापनेपासून आतापर्यंत केवळ पथकांच्या नोंदणीमध्येच पदाधिकारी अडकून पडले आहेत, असा आरोप माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गोविंदा पथकाचे निवृत्त प्रशिक्षक अनंत सावंत यांनी केला आहे. माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गोविंदा पथकाने प्रथम आठ थर रचण्याचा मान पटकावला होता. त्यामागे अनंत सावंत यांची प्रचंड मेहनत होती. थरावर चढण्यासाठी शिडी पद्धत त्यांनीच सुरू केली.
गोविंदांना खांद्यावर नेमका कोठे पाय द्यावा, खांद्यावर कशी पकड घ्यावी, वरच्या गोविंदाच्या खांद्यावर कसे चढावे याचे प्रशिक्षण देण्यात त्यांचा हातखंडा होता. तीन एक्के हा प्रकारही त्यांनी गोविंदा पथकांमध्ये प्रथम सुरू केला. त्यामुळे मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे.
गोविंदा पथकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर समितीने नोंदणीचे काम हाती घेतले. त्यापुढे जाऊन गोविंदा पथकांची गटवारी करणे अपेक्षित होते. कोणते पथक किती थर रचते यानुसार गटवारी व्हायला हवी होती. प्रत्येक गटांमध्ये क्षमतेनुसार थर रचणाऱ्या गोविंदा पथकांचा समावेश करायला हवा होता.
गटानुसार थर रचण्याचे बंधन प्रत्येक पथकावर घालायला हवे होते. हा नियम तोडणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारायला हवा होता. तसे झाले असते तर अपघातांचे प्रमाण कमी झाले असते. मात्र त्यामध्ये समन्वय समितीला स्वारस्य नाही. केवळ नोंदणीचा आकडा फुगविण्यात समिती सदस्यांनी धन्यता मानली. समन्वय समितीने आधीच काळजी घेतली असती तर अपघातांचा प्रश्न निर्माण झाला नसता, अशी टीका अनंत सावंत यांनी केली आहे.
लहान गोविंदा पथके पुरेसे मनुष्यबळ नसताना सात-आठ थर रचण्याचा अट्टाहास करतात. त्यातून अपघात घडतात, गोविंदा जायबंदी होतात. परिणामी सराव करून नऊ थर रचण्याची तयारी असलेल्या काही मोजकी गोविंदा पथके टीकेची लक्ष्य होऊ लागली आहेत. या सर्व गोष्टीला आयोजकांबरोबरच समन्वय समितीही जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.