कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट एक ते सात क्रमांकांना जोडणारा भव्य स्कायवॉक, येत्या काही दिवसांत कल्याण रेल्वे स्थानकात बसविण्यात येणारे सरकते जिने या प्रवासी सुविधांचा विचार करता कल्याण रेल्वे स्थानकाला कापरेरेट लुक आला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी स्कायवॉक व रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागातील फेरीवाल्यांनी कल्याण रेल्वे स्थानकाला जखडून टाकले आहे. रेल्वे स्थानकात ढीगभर सुविधा दिसत असल्या, तरी रेल्वे स्थानक गाठताना प्रवाशांना रेल्वेच्या आवारातील फेरीवाल्यांना पार करताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. या फेरीवाल्यांचे बहुतांशी आशीर्वादकर्ते हे काही लोकप्रतिनिधी आहेत.
रेल्वे पोलीस आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने प्रवाशांना छळण्याचा उद्योग कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुरू आहे.
रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर पुस्तक, पिशव्या विक्रेते रस्त्याच्या मधोमध बसलेले असतात. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान त्यांच्या अवतीभोवती असतात, पण कारवाई केली जात नाही. स्कायवॉकची देखभाल करणाऱ्या कंत्राटदारालाच दमदाटी करण्यापर्यंत या फेरीवाल्यांची मजल जात आहे.
कल्याण पश्चिमेत रेल्वे स्थानकाच्या आवारात टांगे, रिक्षा, फेरीवाले यांचा सकाळपासून रात्रीपर्यंत विळखा पडलेला असतो. वाहतूक पोलिसांकडून अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई केली जात नाही. पालिकेकडून या भागातील फेरीवाले प्रामाणिकपणे हटविले जात नाहीत. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या आतील भाग सुटसुटीत मोकळे असले, तरी बाहेर पडल्यानंतर एका चक्रव्युहात सापडल्यासारखी प्रवाशांची अवस्था होत आहे. रेल्वेचे महाव्यवस्थापक कल्याण परिसरात येणार असले की, रेल्वे स्थानक परिसर तेवढय़ापुरता फेरीवालामुक्त असतो. अन्यवेळी अठरा तास रेल्वे स्थानक बाजाराने व्यापलेले असते. रेल्वे स्थानकावरील, जिन्याखाली झोपलेले भिकारी ही मोठी समस्या कल्याण रेल्वे स्थानकात आहे.
पादचारी पुलाची दुरवस्था
कल्याण पूर्व भागातील लोकग्राम दिशेने जाणाऱ्या पादचारी पुलाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डय़ांप्रमाणे या पुलावरही अक्षरश: खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे पुलावरही डबकी साठतात. प्रवाशांना दुसरा कोणताही पर्याय नसल्याने नाइलाजाने येथूनच ये-जा करावी लागते. रेल्वे प्रशासन इथे एखाद्या अपघाताची वाट पाहतेय का, असा उद्विग्न प्रश्न प्रवासी विचारीत आहेत.
हवा तिसरा पूल
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १अ वरील दोन्ही पादचारी पूल एकाच दिशेला असल्याने स्थानकात ये-जा करताना प्रवाशांची कोंडी होते. या फलाटावरील गर्दीचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी आणखी एका पादचारी पुलाची आवश्यकता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा