लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, येथील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या आणि निवडणूक काळात गैरवर्तन करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी खास भरारी पथकाची निर्मिती करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सहा जणांना तडीपार करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून काहींवर अन्य स्वरूपाची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी नमुद केले.
धुळे लोकसभा मतदार संघातील सहा पैकी मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण हे तीन विधानसभा मतदार संघ येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कार्यकक्षेत येतात. त्यातील बरेच मतदान केंद्र हे संवेदनशील म्हणून ओळखले जातात. त्यामुळे निकोप वातावरणात ही निवडणूक पार पडावी म्हणून पोलीस दलातर्फे विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. एकुण ३३९ शस्त्रपरवाना असलेल्या व्यक्तींपैकी ९२ जणांकडील शस्त्र निवडणूक काळासाठी जमा करण्यात आली आहेत. तसेच गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या १२५ जणांची धरपकड करण्यात आली असून विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दिडशेपेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे कडासने यांनी सांगितले.
निवडणूक काळात आदर्श आचार संहितेचे पालन व्हावे, धार्मिकव सार्वजनिक स्थळांचा दुरुपयोग होऊ नये, मते मिळविण्यासाठी गैरप्रकार होऊ नये, मतदारांना प्रलोभने दाखवली जाऊ नयेत म्हणून पोलीस दलाने यावेळी खास खबरदारी घेतली आहे. अशा घटनांवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथक निर्माण करण्यात आले आहे. पथकात दोन पोलीस उपनिरिक्षक आणि सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. निवडणूक विषयक गैरप्रकार रोखण्यासाठी संशयास्पद ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश या पथकाला देण्यात आले आहेत. निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासह राज्य राखीव दल, सीमा सुरक्षा दल व केंद्रीय राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात करण्यात येणार असल्याचे कडासने यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी पोलिसांची सज्जता
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, येथील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या आणि निवडणूक काळात गैरवर्तन करणाऱ्यांवर करडी
आणखी वाचा
First published on: 14-03-2014 at 03:58 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cops ready for lok sabha election