चेतन भगतचे ‘फाइव्ह पॉइंट समवन’ हे पुस्तक ज्यांनी वाचले असेल त्यांना आयआयटी विद्यार्थ्यांच्या भावविश्वात कायकाय चालते याची माहिती असेल. विद्यार्थी-शिक्षक यांच्यातील खुन्नस, परीक्षांमध्ये चालणारे गैरप्रकार वगैरे भरपूर मसाला या पुस्तकात वाचायला मिळतो. मात्र, प्रत्येक ठिकाणी अशीच परिस्थिती असते असे नाही. तरीही मुंबईच्या आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी आपण कॉपी करण्याची किंवा पेपर लिहित असताना शेजारच्याच्या पेपरात डोकावणे वगैरे अशी ‘इडियट’गिरी केल्याची कबुली दिली आहे!
आयआयटीच्या विद्यार्थ्यांची ही काळी बाजू इथल्या विद्यार्थ्यांनीच केलेल्या एका पाहणीत उजेडात आली आहे. पवईच्या आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे ‘इनसाईट’ नावाचे एक नियतकालिक दर तीन महिन्यांनी प्रकाशित केले जाते. विद्यार्थीच या नियतकालिकात लेखकांची भूमिका बजावतात. या नियतकालिकाकरिता केलेल्या एका पाहणीत आयआयटीच्या विद्यार्थ्यांची ही ‘इनसाईड’ माहिती पुढे आली आहे.
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेल्या प्रश्नावलीच्या आधारे ही पाहणी करण्यात आली होती. ८६७ विद्यार्थ्यांना हे ई-मेल पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३०० विद्यार्थ्यांनी ई-मेलला उत्तर दिले. त्यात तब्बल ५० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा किंवा असाईनमेंट पूर्ण करण्याकरिता छोटय़ामोठय़ा प्रकारची ‘चीटिंग’ केल्याचे मान्य केले आहे.
आयआयटीसारख्या अग्रगण्य संस्थेत शिकणारे विद्यार्थीही या गोष्टी करत असतील ही माहिती आमच्याकरिताही धक्कादायक होती, असे या नियतकालिकाच्या संपादक विद्यार्थ्यांनेही मान्य केले आहे. अर्थात यापैकी तब्बल ९२ टक्के विद्यार्थ्यांनी केवळ लहानसहान असाईनमेंटमध्येच कोणत्या ना कोणत्या प्रकारची फसवणूक केल्याचे मान्य केले आहे. या गोष्टीची जाणीव आयआयटीलाही आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रोजेक्ट किंवा असाईनमेंटमध्ये बरेचदा या गोष्टी आढळून येतात. कित्येकदा संकेतस्थळावरून उतारेच्या उतारे कॉपी-पेस्ट केलेले असतात. हे प्रकार शोधणे शिक्षकांना सोपे असते. या गोष्टी उघडकीस आल्यास अशा विद्यार्थ्यांना एखादे सत्र किंवा संपूर्ण वर्ष विद्यार्थ्यांना घरी बसविण्याची शिक्षा केली जाते. परंतु, शिक्षेपेक्षा विद्यार्थ्यांचे मतपरिवर्तन करण्यावर संस्थेचा भर आहे. त्या करिता वर्षांच्या सुरवातीलाच विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेऊन या गोष्टी करण्यापासून परावृत्त केले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा