गृहमंत्री आर. आर. पाटील, राज्यमंत्री सचिन अहिर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राजाराम माने, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्या विरोधात आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी हिवाळी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव सादर केला. गृहमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाचा भंग केल्याने आणि त्यांना दिलेल्या आदेशाला डावलून पोलीस अधीक्षक जाधव यांनी अवमान केल्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.   
 कोल्हापूर जिल्हय़ातील शाहूवाडी तालुक्यात अनेक वर्षांपासून शेकडो टन बॉक्साईटचे अवैधरीत्या उत्खनन सुरू असल्याने शासनाचा महसूल बुडत चालल्याने याविषयी १४ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी क्षीरसागर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना कोल्हापूर जिल्हय़ात खणीकर्म लॅब स्थापन करण्याबाबत पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार खणीकर्म राज्यमंत्री सचिन अहिर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचे व गौण खनिजासंदर्भात समितीमध्ये सविस्तर चर्चा करण्याचे आदेश दिले. गेल्या नऊ महिन्यांत मंत्र्यांनी आदेश देऊनही या समितीचे गठण झालेले नाही. त्यामुळे आमदार क्षीरसागर यांनी गृहमंत्री व खणीकर्म राज्यमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव सादर केला.    
४ एप्रिल २०१२ रोजी महालक्ष्मी मंदिरातील प्रवेशद्वारे खुले करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महालक्ष्मी मंदिरासाठी योग्य ती सुरक्षा देऊन भाविकांची व पर्यटकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने मंदिराचे चार दरवाजे खुले करण्याचे विधान केले होते. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते. तथापि सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय सुरक्षा आढावा बैठकीत ऑगस्ट महिन्यात घेण्यात आला. आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने गृहमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.