मका हे तृणधान्य प्रकारात मोडत असून सध्या बाजारात त्याचे भाव प्रती क्विंटल ११०० ते १२०० रुपयापर्यंत आहेत, पण डिसेंबर व नंतर जानेवारीत मक्याच्या भावात या तुलनेत १०० ते १५० रुपये भाव वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत. शेतकऱ्यांना बाजारपेठेची कल्पना यावी व चांगला भाव मिळावा म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ दरवेळी प्रत्येक धान्याचे भाव व्यक्त करतात. म्हणजेच ते भाव १२०० ते १३५० रुपये राहण्याची शक्यता आहे.
गेल्या पाच वर्षांत मक्याच्या मागणीत वाढ झाली आहे व याचे कारण म्हणजे, भारतात मांस उत्पादन व कुक्कुटपालन उद्योगात झालेली वाढ हे आहे. त्यामुळे कुक्कुटपालन उद्योगाकडून पशूखाद्याकरिता मक्याची मागणी जास्त आहे. बाजारपेठेत जो मका येतो त्यातील ७५ टक्के मका कुक्कुटपालन उद्योगात वापरला जातो, तर २० टक्के मका स्टार्च तयार करण्याच्या उद्योगात आणि उवरित अल्कोहोल तयार करण्यासाठी वापरला जातो.
भारत हा मक्याच्या उत्पादनात जगात सहाव्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. जगात मक्याचे जे एकूण उत्पादन होते त्यातील ४० टक्के एकटय़ा अमेरिकेत होते. मक्याच्या जागतिक व्यापारात भारताचा वाटा फक्त २ टक्के आहे. महाराष्ट्रात मक्याच्या उत्पादनाचे क्षेत्र .८० दशलक्ष हेक्टर असून उत्पादन २.३ दशलक्ष टन आहे. सांगली, धुळे, सातारा, नंदूरबार, पंढरपूर, चाळीसगाव, मालेगाव, चिखली, लातूर, अकलूज, दोंडाइचा, औरंगाबाद व नासिक या महाराष्ट्रातील मक्याच्या मुख्य बाजारपेठा आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी विपणन माहिती केंद्राने मक्याच्या गेल्या १२ वर्षांच्या मासिक सरासरी किमतीचे पृथ:करण केले असून त्या आधारावर व अभ्यासाच्या निष्कर्षांवर उपरोक्त भावाचे अंदाज व्यक्त केले आहेत. शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा, हा या मागील हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे.

`