कॉर्पोरेट सेक्टरच्या सामाजिक उपक्रमातील निधीचा (सीएसआर) वापर पाण्याच्या पुनर्वापरासाठी, तलावांसाठी तसेच नाल्यांसाठी देण्याची तरतूद करावी, अशी मागणी राज्य सरकारच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी आज दिल्लीत केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांच्याकडे केली.
आयडीएफसी फौंडेशनच्या वतीने दिल्लीत भारतीय ग्रामीण विकास २०१२-१२ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी  जयराम यांची पवार यांची भेट घेऊन मागणी केली. या कार्यक्रमाच्या अहवालात आदर्शगाव हिवरेबाजारची यशोगाथा आकडेवारीसह प्रसिद्ध करण्यात आली आहे. फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेरिश थॉमस, नियोजन मंडळाचे सदस्य मिहिर शहा आदी उपस्थित होते.
ग्रामसभेस उपस्थित राहणा-या गावक-यांमुळे ग्रामसभेस ताकद मिळते त्यामुळे उपस्थित राहणा-या गावक-यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा वैयक्तिक फायदा मिळावा, अशीही मागणी पवार यांनी केली. त्यावर खुलाशात जयराम यांनी केंद्र स्तरावर ग्रामसभेच्या ताकदीचा विचार करावयास हवा, परंतु राज्य सरकारनेही त्यासाठी जास्तीत जास्त दबाव आणला पाहिजे, असे सांगताना त्यांनी हिवरेबाजारच्या पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रमाचे कौतुक केले. भारतातील अडीच लाख ग्रामपंचायतींचे पोपटराव प्रतिनिधित्व करतात, असा उल्लेखही त्यांनी केला.
हिवरे बाजार येथे यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण केंद्रासाठी केंद्र सरकार ५० टक्के मदत देईल असे जयराम यांनी मार्चमध्ये हिवरेबाजारच्या भेटीत आश्वासन दिले होते. त्याची आठवण पवार यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण यांनी केंद्राचे सादरीकरण करत दोन महिन्यांपूर्वीच तसा प्रस्ताव सादर केल्याची माहिती दिली. हा प्रस्ताव त्वरित मंजूर करण्याचे आश्वासन जयराम यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा