मीरा-भाईंदर येथील नगरसेवकांनी आपला स्टेशनरी खर्च महापालिकेकडून मिळणाऱ्या मानधनातूनच करावयाचा असतानाही गेली १० वर्षे तो चक्क महापालिकेच्या निधीतूनच उकळला जात असल्याने अशा फुकटय़ा प्रवृत्तीला आता आळा घातला जाणार आहे.
प्रत्येक नगरसेवकाला दरमहा साडेसात हजार रुपये मानधनापोटी सुमारे ८६ लाख रुपये खर्च होतो. वास्तविक नगरसेवकांनी आपली लेटरहेड, व्हिजिटिंग कार्ड, एन्व्हलप्स आपल्या मानधनातूनच छापून घ्यायला हवीत; परंतु असे न करता सर्वच नगरसेवकांनी आतापर्यंत आपली स्टेशनरी पालिकेच्या खर्चानेच छापून घेतली आहे. त्यापोटी पालिकेच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्च झाला. आता मात्र महापालिकेने अशा खर्चाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतल्याने नगरसेवकांत नाराजी पसरली आहे.
महापालिकेकडून फुकट छापून मिळालेल्या लेटरहेड्स, व्हिजिटिंग कार्ड्स, एन्व्हलप्सचा माजी नगरसेवकांकडून आजही दुरुपयोग चालू असल्याचे दिसून आले आहे. नगरसेवकपद संपुष्टात आलेल्या नगरसेवकांकडून अशी स्टेशनरी पालिकेने परत मागविलेली नाही किंवा नगरसेवकांनी स्वत:हूनही ती परत केलेली नाही. पालिकेचे बोधचिन्ह असलेली ही छापील सामग्री वापरणे म्हणजे दुरुपयोग आहे, पण पालिकेने तसा आक्षेप घेणे आवश्यक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporaters useless stationery expense now going to stop