जून महिन्याचा म्हणे एकत्रित पाऊस पडला..
‘यंदा पाणी तुंबणार नाही’, अशा पद्धतीने तयारी झाल्याचा दावा करणाऱ्या पालिकेला मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा तोंडघशी पाडले आहे. जून महिन्याचा एकत्रित पाऊस पडल्याचे कारण पुढे केले जात आहे. मात्र प्रत्यक्षात यंदाच्या मोसमात पहिल्यांदा झालेल्या संततधार पावसानेही पालिकेचे सारे दावे फोल ठरविले.
सखल भागात पाणी साचणे ही बाब मुंबईकरांसाठी नेहमीचीच. पण यंदा नेहमीच्या सखल भागांबरोबरच पाणी साचण्याच्या १४० नवीन जागा निर्माण झाल्या आहेत. नालेसफाईबाबत वेळोवेळी पालिकेकडून संदिग्ध विधाने केली गेली. एकीकडे ६५ टक्के नालेसफाई केल्याचा दावा राजकीय पक्षाकडून करण्यात आला तर प्रशासनाकडून ९० टक्के नालेसफाई झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा आपला दावा मागे घेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात नालेसफाई झाल्यानंतर टाकलेला गाळ तात्काळ उचलला न गेल्याने तो परत नाल्यात जाऊन त्याचा परिणाम नाले तुंबण्यामध्ये झाला. नालेसफाई योग्य प्रकारे न झाल्यानेच पाणी साठू लागल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. पालिकेच्या म्हणण्यानुसार मुंबईत पूरस्थिती निर्माण होणारे २२२ सखलभाग आहेत. यापैकी १८५ ठिकाणी २२८ पंप बसविण्यात आले आहेत. मात्र शनिवारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे या नेहमीच्या ठिकाणांखेरीज आणखी १४० लहान-मोठय़ा गल्ल्या पाण्याने भरल्या. स्वाभाविकच या ठिकाणी तळमजल्यावर राहणाऱ्यांचे खूप हाल झाले. या नव्या १४० ठिकाणी पाणी कसे साचले याचा अभ्यास महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग करणार असल्याचे पालिकेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

Story img Loader