महासभेत भाजपची लक्षवेधी
दहा दिवसांपूर्वी अवघ्या तासभर पडलेल्या पहिल्याच पावसात पावसाळी गटार योजनेचे पितळ उघडे पडून शहरवासीयांना ज्या बिकट परिस्थतीला सामोरे जावे लागले, त्या विषयावर गुरूवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा होण्याची चिन्हे आहेत. महत्वाची बाब म्हणजे, या प्रश्नावर सत्ताधारी भाजपने लक्षवेधी मांडून प्रशासनाला कात्रीत पकडण्याचे नियोजन केले आहे. तसेच नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरील लक्षवेधीवर चर्चा
होऊ शकते.
सहा जूनच्या पावसाने शहरात अक्षरश: दाणादाण उडवून दिली होती. नैसर्गिकपणे पाणी वाहून नेणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी झालेली अतिक्रमणे आणि तुंबलेल्या गटारी, याची परिणती शहरातील अनेक प्रमुख रस्ते व परिसर पाण्याखाली जाण्यात झाली. खुद्द पालिकेच्या मुख्यालयासह गंगापूररोड, उंटवाडी, नाशिकरोड, सराफ बाजार आदी भागातील दुकाने आणि घरांमध्ये शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी सलग दोन दिवस प्रयत्न करावे लागले. यापूर्वी ज्या भागांत कधी या पद्धतीने पाणी साचले नव्हते, अशा भागातही मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. राजीव गांधी भवनसमोरील शरणपूर रोड, उंटवाडी व गंगापूर रस्ता या भागात दरवर्षी ही समस्या उद्भवत असूनही त्यावर पालिकेने तोडगा काढलेला नाही. कॉलेजरोड, गंगापूररोड सारख्या अनेक रस्त्यांच्या मध्यभागी दुभाजक आहेत. हे दुभाजक पावसाचे पाणी
वाहून जाण्यास मुख्य अडथळा ठरले होते. परिणामी, गंगापूर रस्त्यावरील एक बाजू पूर्णपणे पाण्याखाली गेली होती.
पावसाचे पाणी नदीपात्रात वाहून नेण्यासाठी महापालिकेने पावसाळी गटार योजनेवर कोटय़वधी रूपये खर्च केले आहेत. इतका निधी खर्च होऊनही पावसाचे पाणी काही केल्या वाहून जाऊ शकले नाही. अनेक गटारी तुंबलेल्या असल्याने हे पाणी सरळ रस्त्यावरून वाहत होते.
पावसाळी गटार आणि जे थोडेफार नाले शिल्लक आहेत, त्यांची साफसफाई नसल्याने गटारी व नाल्यांमधून पाणी बाहेर येत होते. नैसर्गिक नाल्यावर झालेली विविध स्वरूपाची अतिक्रमणे त्यास तितकीच जबाबदार असल्याचेही लक्षात आले. पावसामुळे शहरवासीयांना बिकट स्थितीचा सामना करावा लागला असताना पालिकेची यंत्रणा कुठेही लागलीच कार्यप्रवण झाल्याचे पहावयास मिळाले नाही. या एकूणच मुद्यांवरून भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी महासभेत लक्षवेधी मांडण्याचे आधीच जाहीर केले आहे.
या विषयावर सभेत वादळी चर्चा होईल. पाणी साचल्याच्या मुद्यावरून प्रभाग दौऱ्यात खुद्द महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांना सराफ बाजारातील व्यावसायिकांनी धारेवर धरले होते. तशीच स्थिती अनेक प्रभागातील नगरसेवकांचीही झाली. पावसाळी गटार योजनेवर प्रचंड निधी खर्च करूनही तिचा कोणताही उपयोग झालेला नाही.
या प्रश्नावरून नगरसेवकही प्रशासनाला जाब विचारू शकतील. या विषयाबरोबर बिटको रुग्णालयातील गलथान कारभाराविषयी दाखल झालेल्या लक्षवेधीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपचे नगरसेवक कुणाल वाघ यांनी ही लक्षवेधी आधीच मांडलेली आहे. त्यावर अद्याप न झालेली चर्चा यावेळी होऊ शकते.

मान्सूनपूर्व कामांची उपरती
मान्सूनपूर्व कामांअभावी पहिल्याच पावसात नाकातोंडात पाणी गेल्याने पालिकेने हातपाय मारण्यास सुरूवात केली असून जी कामे पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक होते, ती ऐन पावसाळ्यात करण्याची उपरती प्रशासनाला झाली आहे. या विषयावरून सर्वसाधारण सभेत लक्षवेधी दाखल होत असल्याचे लक्षात घेऊन प्रशासनाची धडपड सुरू झाली आहे. पावसाळी गटारांची साफसफाई व दुरूस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याचे बांधकाम विभागाने म्हटले आहे. शहरातील सर्व विभागात या कामांना गती देण्यात आली आहे. पंचवटी विभागात नांदूर शाळा परिसर, सांडव्यावरील भाग व रस्त्यालगतच्या परिसरातील गाळ व कचरा काढण्यात आला. आडगाव ते म्हसरूळ रस्त्यावरील सीडी वर्कमधील तसेच हॉटेल जत्रालगतच्या परिसरात केरकचरा काढून पावसाळी नाले सफाई स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. विभागातील सर्व भागात ही मोहीम राबविली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मान्सूनपूर्व कामे खरेतर एप्रिल व मे महिन्यात पूर्णत्वास जाणे गरजेचे असते. तथापि, शहराच्या समस्यांशी सोयरेसूतक नसलेले सत्ताधारी व प्रशासनाने भर पावसाळ्यात रस्त्यांच्या डांबरीकरणाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिका प्रशासनाकडून कोणत्या कामांना किती व कसे महत्व दिले जाते ही बाब या कार्यशैलीवरून लक्षात येऊ शकेल.

ढाप्यांऐवजी जाळ्या हा इलाज नव्हे!
नाशिकमध्ये मृगाच्या जोरदार सलामीने महानगरपालिकेचे पितळ उघडे पडले. मग महापौरांनी सराफ बाजार, दहीपूल, हुंडीवाला लेन परिसरात दौरा केला. सोबत शहर अभियंता सुनील खुने होते. या दौऱ्यातून सर्व ठिकाणी अंडरग्राऊंड नाल्यांवर ढाप्यांऐवजी जाळ्या टाकण्याचे निश्चित झाले. वास्तविक जाळ्या टाकणे हा यावरील इलाज नाही. परंतु, काहीतरी काम केले हे दाखविण्यासाठी हा चाललेला खटाटोप. अनेक वर्षांपासून या परिसरात राहत असलेल्या नागरिकांना जर विचारले तर तेही सांगतील की, या ठिकाणी जाळ्या बसवून काहीही उपयोग होणार नाही. कारण, ज्या ठिकाणी जाळ्या होत्या, त्या ठिकाणाहून गटारीचे पाणी बाहेर आले अणि ते सर्व दुकानांमध्ये शिरले. इतकेच नव्हे तर, ज्यांनी हा पहिला पाऊस पाहिला, त्यांच्याही लक्षात ही गोष्ट येईल की, दहीपूल परिसरात पाणी साचलेले असताना त्यावर हजारोंनी प्लास्टिक बॉटल्स व पिशव्या तरंगत होत्या. असे असताना जे करायचे नाही परंतु, काहीतरी केले हे दाखविण्यासाठी या सर्व परिसरात गटारींना जाळ्या टाकण्याचे काम आता पालिका हाती घेणार आहे. म्हणजे एकंदरीत काय तर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना खालून वाहणाऱ्या मैलायुक्त पाण्याचा वास, डासांचा प्रचंड प्रादुर्भाव आणि त्यातून बाहेर येणारे उंदीर व घुशी यांचा त्रास सहन लागणार आहे. यातून भविष्यात रोगराईला सामोरे जावे लागणार आहे.
जाळ्या लावल्याने पाणी वाहून जाईल, असे समजणे चुकीचे ठरेल. कारण, दहीपुलावर एकच जाळी आहे. एका जाळीमुळे एका तासात पाणी दुकानांमध्ये शिरले तर अशा अनेक जाळ्या बसविल्यास दहा मिनिटात पाणी दुकानांमध्ये शिरेल, हे साधे गणितही पालिकेला समजू  नये ?
महापौरांनी आधी एक बाब लक्षात घ्यायला हवी की ज्या दहीपुलावरील हुंडीवाला लेन परिसरातील व्यापाऱ्यांनी याबाबत निवेदन दिले, त्यांना हा प्रश्न विचारावा की तुमची दुकाने इतकी
खाली कशी? कारण, पूर्वी ही सर्व दुकाने कितीही पाऊस झाला तरी नुकसान होणार नाही इतक्या उंचीवर होती. परंतु व्यापाऱ्यांनी त्यांच्या सोईसाठी ती रस्त्यालगत केली. मग, त्यांचा त्रास परिसरातील नागरिकांनी का सहन करायचा असा प्रश्न निर्माण होतो. कारण, ही सर्व मंडळी बाहेर राहणारी आहेत. त्यामुळे त्यांना यातील कोणताही त्रास सहन करावा लागत नाही. मागे एकदा अशाप्रकारे जाळ्या लावण्यात आल्या होत्या. तेव्हा स्थानिक नागरिकांनी त्याकडे लक्ष वेधल्यावर जाळ्या काढून
पुन्हा त्या जागी ढापे बसविण्यात आले. त्यामुळे कोणी व्यापाऱ्यांनी सांगितले म्हणून सर्वच ठिकाणी ढाप्यांच्या जागी जाळ्या बसविण्याचा तोडगा अवलंबू नये.
    – अभिजित कुलकर्णी,
    हुंडीवाला लेन, नाशिक

Story img Loader