जखमी गोविंदांना ५० हजार रुपयांची मदत करण्याच्या नगरसेवकांच्या आग्रही मागणीमुळे पालिकेला ‘मदतीची दहीहंडी’ बांधताच आली नाही. अखेर हा प्रस्ताव मागे राखून ठेवण्यात आला. त्यामुळे पुढील महिन्यात येणाऱ्या गोकुळाष्टमीच्या पाश्र्वभूमीवर यंदा जखमी गोविंदांना पालिकेची मदत मिळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
गणेश विसर्जनसमयी व दहीहंडी फोडताना जखमी होणाऱ्यांना अनुक्रमे १५ हजार रुपये, तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या नातेवाईकांना दीड लाख रुपये मदत देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. मात्र दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईत येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या गोविंदांना मदत देण्यास पालिकेने नकार दिला होता. त्यास नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने अखेर मुंबईत दहीहंडी फोडण्यासाठी आलेला गोविंदा जखमी झाल्यास त्याला मदत करण्याची तयारी प्रशासनाने दाखविली. मात्र मुंबईबाहेर दहीहंडी फोडण्यासाठी जाणाऱ्या मुंबईकर गोविंदास मदत देता येणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी स्पष्ट केले. तसेच जखमींना १५ हजारांऐवजी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी करीत नगरसेवकांनी घालत हा प्रस्तावच रोखून ठेवला. अखेर संबंधित विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन अडतानी यांनी दिले. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा