सेवानिवृत्त शिक्षकांचा आरोप
मनपा शिक्षण मंडळातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची दीर्घकालीन प्रलंबित आर्थिक देयके देण्यात मंडळ वेळकाढूपणा करीत असल्याची तक्रार सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेतर्फे पालिका आयुक्त, शिक्षण मंडळ प्रशासक व प्रभारी प्रशासनाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. एक एप्रिल २००४ ते डिसेंबर २००५ या कालावधीतील २१ महिन्यांचे निवड श्रेणी बिल त्वरित देणे, सहाव्या वेतन आयोगाचा जून २०१३चा पाचवा हप्ता त्वरित देणे, जानेवारीपासून वाढलेला वाढीव महागाई भत्ता लागू करणे, दरमहाचे नियमित निवृत्ती वेतन दहा तारखेच्या आत देणे या मागण्यांचा समावेश आहे. शिक्षण मंडळ प्रशासनाने २१ महिन्यांचे बिल २००६ नंतर निवृत्त झालेल्या काही मोजक्या पदवीधर शिक्षकांना कोणत्या नियमाखाली अदा केले याचे गौडबंगाल काय, असा सवालही संघटनेने केला आहे.
काहींना तुपाशी तर वृद्धांना उपाशी आणि ‘देईल तोच घेईल’ असे शिक्षण मंडळाचे धोरण सर्वानाच संभ्रमात टाकणारे असल्याचेही म्हटले आहे. सेवानिवृत्त शिक्षक आधीच वैद्यकीय खर्चाने बेजार झाले आहेत. त्यामुळे सर्व प्रलंबित बिले तत्काळ द्यावीत, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष नथुजी देवरे, मंगला गोजरे, उत्तमराव देवरे आदींनी दिला आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा