महापालिकेची निवडणूक जवळ आली असतानाच गुलाबराव देवकरांना मंत्रिपद गमवावे लागल्याने निवडणुकीत राष्ट्रवादीची जबाबदारी आता कोण पेलणार, हा प्रश्न येथे चर्चेत आहे. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या आघाडीचे प्रयत्नही फळास येण्याची शक्यता देवकरांच्या गच्छंतीमुळे अंधूक झाली आहे.
महापालिकेची तिसरी निवडणूक ऑगस्टच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे, समाजवादी पार्टी, काँग्रेस व सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी आघाडीने त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातही महापालिका घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन हे न्यायालयीन कोठडीत असल्याने महापालिका ताब्यात घेण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे राष्ट्रवादी व भाजपला वाटत आहे. जैन यांच्या अनुपस्थितीचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपने आपापल्या परीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
देवकरांकडे राज्यमंत्रिपदासह पालक मंत्रिपदही होते. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याशी त्यांचे चांगले सख्य आहे. त्यामुळेच सुरेश जैन यांच्या गटाला महापालिकेतील सत्तेतून खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. दोन्ही पक्षांनी जागांच्या वाटपाविषयी चर्चाही सुरू केली होती, अशी माहिती राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष मनोज चौधरी यांनी दिली होतीे.
तथापि ही सर्व प्रक्रिया सुरू असतानाच देवकरांचे मंत्रिपद गेले आणि भुसावळच्या संजय सावकारे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यामुळे जळगावमध्ये वास्तव्य असलेल्या देवकरांचे महत्त्व अचानक कमी झाले असून भुसावळ हे राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ातील प्रमुख केंद्र झाले आहे.
जळगावच्या घरकुल घोटाळ्यानेच देवकरांचा बळी घेतला हे त्यांच्या मंत्रिमंडळातून पायउतार झाल्याने स्पष्ट झाले आहे. ते घोटाळ्यातील एक संशयित आहेत. त्यांना अटकही झाली होती. अशा डागाळलेल्या व्यक्तीवर महापालिका निवडणुकीची जबाबदारी असावी का, याबद्दल येथे चर्चा सुरू होती. संजय सावकारे आता मंत्री आहेत व पालक मंत्रिपदही त्यांच्याकडेच जाणार आहे. फक्त त्यांचा निवास भुसावळमध्ये असल्याने जळगावचे स्थानिक राजकारण त्यांना कितपत हाताळता येईल हे सांगणे कठीण आहे. सावकारे यांचा राजकीय प्रवास फारसा लांबलचक नाही.
मुंबईत अभियंत्याची नोकरी ते भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे स्वीय साहाय्यक अशी त्यांची आमदार होण्यापूर्वीची ओळख. भुसावळची जागा राखीव झाल्याने चौधरी यांच्या शिफारशीवरून उमेदवारी मिळणे आणि पहिल्याच प्रयत्नात आमदारकी आणि आता मंत्रिपद मिळणे, असा योग त्यांच्या बाबतीत जुळून आला आहे.खंडणीप्रकरणी चौधरी हे तुरुंगात असताना त्यांच्या अनुपस्थितीत दीड वर्षांपूर्वी झालेल्या भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत सावकारे यांनी राष्ट्रवादीला बहुमत मिळवून देत पालिकेतील सत्ता राखण्याचे मोलाचे काम केले आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे तसेच माजी मंत्री आमदार सुरेश जैन यांनी भुसावळातच ठाण मांडून अत्यंत प्रतिष्ठेची केलेली ती निवडणूक कोणताही गाजावाजा न करता, कोणत्याही बडय़ा नेत्याची प्रचार सभा न घेता नियोजनबद्ध प्रचार व बैठका घेऊन सावकारेंनी जिंकली होती. देवकर यांनी मंत्रिपदाच्या आपल्या कार्यकाळात मोजक्याच लोकांना महत्त्व देत पक्षांतर्गत विरोध ओढवून घेतला आहे. स्थानिक गटबाजी त्यांना आवरता आलेली नाही. त्यामुळे महापालिकेची जबाबदारी देवकरांवर अजिबात नको असे राष्ट्रवादीतील एका गटाचे म्हणणे आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी व भाजपच्या आघाडीची जी चर्चा होती ती निष्फळ ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. भाजपच्या गिरीश महाजन यांसह काही आमदारांनी त्यास विरोध दर्शविला असून राष्ट्रवादीचे काही विद्यमान नगरसेवक ईश्वरलाल जैन यांना मानणारे असल्याने आघाडी अशक्य असल्याचे म्हटले जात आहे.
महापालिका निवडणूक : राष्ट्रवादी नवीन नेतृत्वाच्या शोधात
महापालिकेची निवडणूक जवळ आली असतानाच गुलाबराव देवकरांना मंत्रिपद गमवावे लागल्याने निवडणुकीत राष्ट्रवादीची जबाबदारी आता कोण पेलणार, हा प्रश्न येथे चर्चेत आहे. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या आघाडीचे प्रयत्नही फळास येण्याची शक्यता देवकरांच्या गच्छंतीमुळे अंधूक झाली आहे.
आणखी वाचा
First published on: 18-06-2013 at 09:18 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporation election ncp searching the new leadership