चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या एक हजार मेगावॅटच्या विस्तारित प्रकल्पाकडून महापालिकेने ४ कोटी १३ लाखाचा स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसूल केला आहे. फेब्रुवारीत विक्रमी ६ कोटी ३१ लाखाचा एलबीटी वसूल झाल्याने महापालिका मालामाल झाली आहे.
गेल्या नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व महापालिकेत स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात आला आहे. राज्यातील इतर ठिकाणी एलबीटी वसूल होत नसल्याने महापालिका आर्थिक अडचणीत सापडलेल्या असतांनाच चंद्रपूर महापालिका मात्र एलबीटी वसुलीमुळे मालामाल होत आहे. एलबीटी कर जाहीर होताच स्थानिक व्यापाऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केला होता, मात्र राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने कुठल्याही परिस्थितीत हा कर रद्द होणार नाही, अशी भूमिका घेतल्याने व्यापाऱ्यांनाही नमते घ्यावे लागले. आता महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी आयुक्त प्रकाश बोखड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक गठीत केले आहे. या पथकाचे प्रमुख देवानंद कांबळे असून संजय टिकले, सुरेश माळवे, प्रमोद येरणे, अनिल बाकरवाले, राजेंद्र लाखे यांचा त्यात समावेश आहे.
या पथकाने महाऔष्णिक वीज केंद्राच्या एक हजार मेगाव्ॉटच्या नवीन विस्तारित प्रकल्पाकडून अवघ्या वीस दिवसात ४ कोटी १३ लाखाचा एलबीटी वसूल केला आहे. वीज केंद्राचा हा विस्तारित प्रकल्प महापालिकेच्या हद्दीत येतो, हे आयुक्त बोखड यांना माहिती होताच त्यांनी वीज केंद्राला एलबीटी भरण्याचे पत्र दिले. सुरुवातीला वीज केंद्राने नकारात्मक भूमिका घेतली, मात्र आयुक्त बोखड यांनी कठोर भूमिका घेऊन एलबीटी कर द्यावाच लागेल, अन्यथा कारवाई करावी लागेल, असे पत्र देताच वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या वीस दिवसात ४ कोटी १३ लाखाचा एलबीटी महापालिकेच्याा खात्यात जमा केला.
सध्या या प्रकल्पाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यासाठी लागणारी महागडी यंत्रसामुग्री, बॉयलर व इतर साहित्यही येत आहे. त्यामुळे येत्या काळात वीज केंद्राकडून कोटय़वधीचा एलबीटी येण्याची शक्यता आयुक्त बोखड यांनी लोकसत्ताजवळ व्यक्त केली. वीज केंद्रासोबतच एमईएल व इतर उद्योगही महापालिकेच्या हद्दीत येतात. त्यांनाही एलबीटी भरण्याचे पत्र देण्यात आले आहे. एलबीटीच्या मुद्यावर एमईएलने उद्योग न्यायालयात धाव घेतली आहे. औद्योगिक जिल्हा असलेल्या या शहरातील उद्योगांकडून एलबीटीच्या स्वरूपात कोटय़वधीचा महसूल महापालिकेच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे, या शहराला लागून असलेल्या सर्व उद्योगांची यादी तयार करण्यात आली असून त्यांनाही एलबीटीचे पत्र देण्यात येणार आहे. दरम्यान, फेब्रुवारीत आजवरचा सर्वाधिक एलबीटी कर ६ कोटी ३१ लाख रुपये जमा झाले आहेत. भविष्यात या करात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महापालिकेने महिन्याकाठी ३ कोटीच्या एलबीटीचे उद्दिष्ट गृहीत धरले आहे. उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली होत असल्याने महापालिका मालामाल झाली आहे.

Story img Loader