कल्याण डोंबिवली परिसरातील प्रवाशांना दर्जेदार सेवा देता यावी यासाठी बस खरेदीसाठी कल्याण डोंबिवली परिवहन ऊपक्रमाला दोन कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंबंधीचा धनादेश नुकताच परिवहन ऊपक्रमाकडे सुपूर्द करण्यात आला.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ताफ्यातील जेमतेम ७५ बसेस वेगवेगळ्या मार्गावर धावत आहेत. यापैकी बऱ्याच बसेस सातत्याने बंद असतात. त्यामुळे केडीएमटीच्या सेवेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र सर्वत्र दिसते. केडीएमटीकडून पुरेशी सेवा मिळत नसल्याने शहरातील रिक्षा चालकांचे फावते, असा अनुभव आहे. रिक्षा भाडेवाढीमुळे मध्यंतरी प्रवाशांनी केडीएमटी बसेसचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अनियमीत सेवेमुळे प्रवाशांचा नाईलाज होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे केडीएमटीच्या ताफ्यात आणखी नव्या बसेस याव्यात यासाठी महापालिकेने उपक्रमाला दोन कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. बस खरेदीसाठी या निधीचा वापर करावा, अशी अट महापालिकेने घातली असून अन्य कोणत्याही कारणासाठी या निधीचा वापर करता येणार नाही, अशी माहिती महापलिकेतील वरिष्ठ ेसूत्रांनी दिली. दरम्यान, या निधीतून दहा बसेस खरेदी करता येतील, अशी माहिती केडीएमटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तान्तला दिली. पुढील महिन्यात केडीएमटीच्या ताफ्यात २० मिडी बस दाखल होणार आहेत. त्यात या दहा बसची भर पडली तर शहरातील अंतर्गत प्रवासी वाहतूक अधिक चांगली करता येईल, असा विश्वास सभापती गोडबोले यांनी व्यक्त केला. डोंबिवली रेल्वे स्टेशन ते एमआयडीसी प्रवासी बसमध्ये सातत्य असल्याने या वाहतुकीला चांगला प्रतिसाद प्रवाशांचा मिळतो आहे. डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील अनेक काही मार्गावर बससेवा सुरू केली तर प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.   

Story img Loader