महापालिकेची सर्वसाधारण सभा नव्या वर्षांत नव्या सभागृहात होण्याची चिन्हे आहेत. गेले वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू असलेले सभागृहाचे काम आता ८० टक्के पूर्ण झाले असून जानेवारीच्या पहिल्या तारखेला सभागृहाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
खुद्ध महापौर शीला शिंदे व आयुक्त विजय कुलकर्णी यांनीच तशी खात्री आज व्यक्त केली. स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, सभागृह नेते अशोक बडे, शहर अभियंता नंदकुमार मगर, नगरसेवक सचिन पारखी, तसेच अन्य नगरसेवक व अधिकाऱ्यांसमवेत महापौर श्रीमती शिंदे व आयुक्त कुलकर्णी यांनी आज दुपारी १ वाजता मनपाच्या नव्या प्रशासकीय इमारतीतील या सभागृहाच्या कामकाजाची पाहणी केली. वास्तूआरेखक किरण कांकरिया त्यांच्याबरोबर होते. त्यांनी सर्वाना बांधकामांची, तसेच सभागृहात केलेल्या विविध सोयींची माहिती दिली.
जकात ठेकेदाराने दिलेल्या जकातीच्या ठेक्याशिवायच्या सव्वा कोटी रूपयांच्या रकमेतून हे सभागृह बांधले जात आहे. तशी तर ही नवी प्रशासकीय इमारतच जकात ठेकेदारांना ठेक्याशिवाय विकासकामासाठी दिलेल्या रकमेतून बांधली गेली आहे. त्यातील सभागृहाचे कामच गेली २ वर्षे रखडले आहे. सुरूवातीला हे सभागृह चुकीचे बांधले गेले. त्यानंतर त्याच्या गॅलरीचा काही भाग पाडण्यात आला. त्यानंतर सभागृहाच्या बांधकामाचा आराखडा तयार करण्यात आला. तो भलताच खर्चिक असल्याची काही नगरसेवकांची तक्रार आहे.
या नव्या सभागृहाच्या भिंती साऊंडप्रुफ केल्या आहेत. बसण्यासाठी नगरसेवक व अधिकाऱ्यांना उत्तम कंपनीची चांगली आसने आहे. छत सुशोभीत करण्यात आले आहे. बोलण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला स्वतंत्र ध्वनीक्षेपक असेल. याशिवाय आणखीही बऱ्याच सोयी सभागृहात करण्यात आल्या आहेत. कांकरिया यांनी महापौर व आयुक्तांना सांगितले की बहुतेक काम पूर्ण झाले असून आता आसने बसवायची शिल्लक आहेत. तेही काम लवकरच होईल. जानेवारीच्या सुरूवातीला सभागृहाचे उद्घाटन करता येणे शक्य आहे, अशी माहिती त्यांनी दिली.