रस्त्यांवर फि रणाऱ्या मोकाट सांडांनी पावसाळ्यात मांडलेला उच्छाद नागरिकांसाठी मोठा तापदायक ठरला असून या सांडांचे करायचे काय, या प्रश्नाने प्रशासनही त्रस्त झाले आहे.
शहरात दहा ते पंधरा मोकाट सांड आहेत. अगडबंब देहाचे हे मोकाट प्राणी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असतात. पावसाळ्यात कसेबसे मार्गक्रमण करणारे दुचाकीस्वार या सांडांना वळसे घालून जावे लागल्याने पडत असल्याच्या बऱ्याच घटना घडत आहे. मंगळवारी आर्वी नाका परिसरात एका वृद्ध शेतकऱ्याच्या बंडीला एका सांडाने धडक दिल्याने बंडी उलटली तर उपस्थित लोकांनी वृद्धाला कसेबसे ओढत बाजूला नेले. या सांडांबाबत काय कारवाई करावी, याचा प्रशासनापुढे पेच आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनीही काही कारवाई करता येईल का, याबाबत विचारणा केली आहे. नगरपालिकेकडे कोंडवाडा नसल्यामुळे पीपल्स फ ॉर अ‍ॅनिमलचे सचिव आशिष गोस्वामी यांच्या करुणाश्रमात दहा बेवारस सांडांना यापूर्वी ठेवण्यात आले आहे. उर्वरित बेवारस सांडांचा नागरिकांना मोठा त्रास होतो. आजपासून आम्ही सांडांना पकडण्याचे काम पालिकेच्या विनंतीवरून करणार आहोत. या अगडबंब सांडांना बेशुध्दीचे औषध दिल्यावर जेसीपीच्या सहाय्याने कंटेनरमध्ये टाकण्यात येईल. पुढे त्याचा पोषणाचा खर्च पालिकाच करणार आहे. असे गोस्वामी म्हणाले.