पिंपरी पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यपध्दतीला विरोध म्हणून सभेचे कामकाज रोखून धरणाऱ्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याने दोन पावले मागे येण्याची भूमिका घेतली. त्यानुसार, सोमवारी पालिका सभेचे कामकाज झाले. तथापि, आयुक्त गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीने थयथयाट केला. नियम फक्त नगरसेवकांनाच का, ते आयुक्तांना नाहीत का, असा आक्षेप पक्षनेत्या मंगला कदम यांनीच घेतला. त्यामुळे आयुक्त व राष्ट्रवादीत वरकरणी ‘पॅचअप’ झाले असून अंर्तगत संघर्ष कायमच असल्याचे दिसून येते.
आमदारांच्या सूचनेनुसार सभेचे कामकाज थांबवणाऱ्या महापौर मोहिनी लांडे यांनी सोमवारची सभा घेतली. तेव्हा आयुक्त सभागृहात नव्हते. त्यांच्या आसनावर अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम होते.
यावरून सत्तारूढ पक्षनेत्या या नात्याने मंगला कदम यांनी आयुक्तांच्या अनुपस्थितीविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आयुक्त पाच दिवसांसाठी
उपलब्ध नाहीत, ते चेन्नईला गेले आहेत. त्यांनी आपली सूत्रे अतिरिक्त आयुक्तांकडे दिली आहेत.
मात्र, या कालावधीत दोन पालिका सभा आहेत, याची त्यांना पुरेपूर माहिती असतानाही ते निघून गेले, याचा अर्थ त्यांना सभेला सामोरे जायचे नव्हते. अशा पध्दतीने आयुक्तांनी सभा टाळून निघून जाणे चांगली गोष्ट नाही. ते आल्यावर पुन्हा बैठका घेणार आणि हीच माहिती अधिकाऱ्यांकडून घेत राहणार. पालिका अधिनियम आहेत, ते फक्त नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसाठी आहेत का, आयुक्तांना कोणतेही नियम लागू होत नाहीत का, असा मुद्दा कदम यांनी उपस्थित केला. तत्पूर्वी, राष्ट्रवादीसह अनेक नगरसेवकांनी आयुक्तांच्या उपस्थितीचा मुद्दा अधोरेखित केला होता. या संदर्भात, आयुक्त शासनाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले आहेत, शुक्रवारी ते रुजू होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या घडामोडी पाहता आयुक्त व राष्ट्रवादीतील संघर्ष कायम असल्याचे चित्र पुढे आले आहे.
आयुक्तांची पालिका सभेला ‘दांडी’ अन् राष्ट्रवादीकडून थयथयाट
पिंपरी पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यपध्दतीला विरोध म्हणून सभेचे कामकाज रोखून धरणाऱ्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याने दोन पावले मागे येण्याची भूमिका घेतली. त्यानुसार, सोमवारी पालिका सभेचे कामकाज झाले.
First published on: 13-02-2013 at 02:42 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporation meet the corporation commissioner remain absent