आर्णी नगर परिषदेचे विकास कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत असून निधी उपलब्ध असताना विकास कामे का रखडली, याबाबत उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे. नगर परिषदेची निर्मिती होऊन एक वर्षांच्यावर कालावधी झाला. मात्र, अनेक रस्ते अद्यापही नादुरुस्त आहे. जागोजागी पाण्याचे डबके साचल्याने व खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक रस्त्यांचे टेंडर काढण्यात आले. कामाचे वाटपही झाले. मात्र, कामाला सुरुवात झालेली नाही. ग्रामपंचायतमुळे विकास होत नाही म्हणून मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या प्रयत्नाने आर्णीला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाला. काँग्रेस पक्षाकडेच बहुमत असून नगराध्यक्ष अनिल आडे व उपनगराध्यक्ष आरीज बेग यांनी विकास निधीही खेचून आणला. मात्र, नगर परिषदेतील अंतर्गत कुरबूर विकास कामासाठी अडसर ठरत आहे की काय, असा सूर उमटताना दिसत आहे.
प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेकडे धुरा आहे. त्यांचे नेतृत्व प्रवीण मुनगीनवार करतात. त्यांनी मागे नगर परिषदेत अनागोदी कारभार असल्याचा आरोप करत उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र, त्यांना आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सत्ताधारी नेत्यांनी यश मिळविले होते. त्यानंतर काँग्रेसच्याच काही नगरसेवकांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांविरुद्ध एल्गार पुकारला होता. त्यामुळे नगर परिषदेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत असताना सुद्धा ‘सब कुछ ठीकठाक नही है! अशी परिस्थिती असल्याचे स्पष्ट होते. सत्ताधारी असो अथवा विरोधी आर्णी शहराचा विकास व्हावा व गटबाजी होऊ नये, या दिशेने नगरसेवकांनी कार्य केल्यास समस्यांचे निराकरण करण्यास गती मिळू शकेल अन्यथा, कामे थंडबस्त्यात पडून विकास कामे ठप्प पडल्याशिवाय राहणार नाही. नगर परिषदेचे मुख्याधिकारी मानकर यांनी या संदर्भात पुढाकार घेत आर्णीकरांच्या समस्या निकाली काढाव्या, अशी मागणी पुढे येताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा