शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांची संख्या मोजून ते बुजविण्यासाठी मुंबई महागरपालिकेच्या रस्ते विभागाने खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली. परंतु, खड्डे बुजविण्याच्या कामात वापरण्यात आलेले डांबर निकृष्ट दर्जाचे होते, त्यात भेसळ होती का हे तपासण्यासाठी आता पालिकेने एसजीएस या कंपनीची निवड केली आहे.
पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्यात आल्यानंतर त्यापैकी २०-२२ टक्के खड्डे तपासण्यात येतील. यासंदर्भात अद्याप कोणतीही निविदा काढण्यात आलेली नाही, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांकडून देण्यात आली. मुंबईत पावसाळ्यात झालेल्या खड्डय़ांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठय़ा प्रमाणावर राजकारण झाले होते. त्याचबरोबर पालिका प्रशासनावरही मोठय़ा प्रमाणात टीका झाली. यंदाच्या पावसाळ्यात तब्बल २४ हजार खड्डे बुजविण्यात आले. त्यापैकी पुन्हा उखडलेल्या खड्डय़ांची तपासणी करून त्यामध्ये वापरण्यात आलेला माल भेसळीचा होता किंवा काय याबाबत शोध घेतला जाणार आहे.