नवी दिल्लीमधील लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनाचे मुंबईकरांना मुंबईतच ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घडणार आहे. येत्या २६ जानेवारी रोजी मरिन ड्राइव्हवर होत असलेल्या संचलनाच्या सोहळ्यात लष्कर, नौदल, हवाईदलाच्या जवानांबरोबरचमुंबई महापालिकेचे अग्निशमन दल आणि सुरक्षा रक्षक दलातील जवानही सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात मुंबईच्या शिल्पकारांना चित्ररथाच्या माध्यमातून पालिका वंदन करणार आहे. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कारही एक आकर्षण ठरणार आहे.नवी दिल्लीमध्ये होणारे संचलन केवळ दूरचित्रवाणीवर पाहण्यात सुख मानणाऱ्या मुंबईकरांना यंदा त्याचे मुंबईतच थेट दर्शन घडणार आहे. या संचलनात अग्निशमन दल आणि पालिकेच्या सुरक्षा रक्षक दलाच्या जवानांचे पथकही सहभागी होणार आहे. दिंडोशी अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रीतम सावंत यांच्या नेतृत्वाखालील ७३ जवानांचे पथक संचलनामध्ये सहभागी होणार आहे. त्याच वेळी दरवर्षी प्रमाणे पालिका मुख्यालयासमोर होणाऱ्या संचलनात अग्निशमन दलाची दुसरी तुकडी सहभागी होणार आहे. पालिकेच्या मालमत्तांचे संरक्षण करणाऱ्या सुरक्षा रक्षक दलाची एक तुकडी मरिन ड्राईव्हवरील संचलनात सहभागी होणार आहे. ७२ सुरक्षा रक्षकांचा समावेश असलेल्या या तुकडीचे नेतृत्व विभागीय सुरक्षा अधिकारी अंकुश सूर्यवंशी करणार असून त्यांना सहाय्यक सुरक्षा अधिकारी अजित तावडे, शेखर उदराज सहाय्य करणार आहेत.
मुंबईकरांना सलाम
मुंबापुरीच्या जडणघडणीत हातभार लावणाऱ्या मान्यवरांना संचलनाच्या माध्यमातून वंदन करण्यासाठी महापालिकेने चित्ररथ सजविला आहे. मुंबईचे खरे नागरी जीवन एकोणिसाव्या शतकात उदयास आले. नागरिकांना पाणीपुरवठा, रात्रीची दिवाबत्ती, आरोग्याची साधने आदी सुविधा मिळवून देण्यासाठी अनेकांनी योगदान दिले. नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेट, विश्वनाथ नारायण मंडलीक, डॉ. भाऊ दाजी लाड, काशिनाथ त्र्यंबक तेलंग, सर जमशेटजी जीजीभॉय बाटलीवाला, दादाभाई नौरोजी, सर फिरोजशहा मेहता, डेव्हिड ससून, प्रेमचंद रायचंद, बद्रुद्दिन तैयबजी, जमशेटजी टाटा, डॉ. जॉन विल्सन, दादासाहेब फाळके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जे. आर. डी. टाटा यांसारख्या धुरिणांमुळे कापडाची गिरणी, कारखाने, त्यात राबणाऱ्या कामगारांसाठी चाळी आदी उभे राहिले. शिक्षणाचे मोल ओळखून शाळा सुरू झाल्या. मुंबईच्या जडणघडणीत हातभार लावणाऱ्या या प्रत्येकाला चित्ररथाच्या माध्यमातून वंदन करण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्याचबरोबर जुन्या मुंबईचे दर्शनही चित्ररथाच्या माध्यमातून मुंबईकरांना घडणार आहे.
पाणी, स्वच्छता, रस्त्याची रंगोटी
मुंबईत प्रथमच होत असलेले संचलन पाहण्यासाठी मरिन ड्राइव्ह परिसरात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पदपथ आणि दुभाजक रंगविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. तसेच दुतर्फा बॅरिकेड बांधण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचे टँकरही उपलब्ध करण्यात येणार आहेत. १४ मोबाइल शौचालये आणि ४ रासायनिक शौचालयेही पुरविण्यात येणार आहेत. मुळात या भागातील स्वच्छतेवर पालिकेचे विशेष लक्ष असते. मात्र संचलनानिमित्त स्वच्छतेवर अधिक भर देण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील धक्का, बसण्याचा चौथरा धुऊनपुसून लख्ख करण्यात येणार आहेत. त्यासाठी रसायनांचाही वापर करण्यात येणार आहे. संचलन पार पडल्यानंतरही पुन्हा साफसफाई केली जाणार आहे.
प्रजासत्ताकदिन संचलनात मुंबईच्या शिल्पकारांना पालिकेचा प्रणाम!
नवी दिल्लीमधील लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनाचे मुंबईकरांना मुंबईतच ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घडणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-01-2014 at 06:19 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporation of mumbai greetings to mumbai creators on republic day