शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य यापुढील काळात सुरू ठेवणे, हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली ठरेल, अशी भावना महापौर मोहिनी लांडे यांनी मंगळवारी पालिका सभेत व्यक्त केली. बाळासाहेबांचे तैलचित्र सभागृहात लावण्याची आग्रही मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केली, त्यास शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे यांनी अनुमोदन दिले.
महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखालील सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी बाळासाहेबांविषयी आपल्या भावना व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली, तेव्हा अनेकजण भावूक झाले होते. भाऊसाहेब भोईर, श्रीरंग बारणे, मंगला कदम, सुलभा उबाळे, आर. एस. कुमार, वसंत लोंढे, विलास नांदगुडे, चंद्रकांता सोनकांबळे, सीमा सावळे, महेश लांडगे, अनंत कोऱ्हाळे, जितेंद्र ननावरे, अश्विनी मराठे, अजय सायकर, धनंजय आल्हाट, रामदास बोकड, गोरक्ष लोखंडे, शमीम पठाण, तानाजी खाडे, नारायण बहिरवाडे, संपत पवार, सीमा फुगे, शारदा बाबर, अमिना पानसरे, सुजाता पालांडे, सुरेश म्हेत्रे, शीतल िशदे, राहूल जाधव, अनुराधा गोफणे, आशा शेंडगे, बाळासाहेब तरस, वनिता थोरात आदींनी श्रध्दांजली वाहिली.
सभेचा समारोप करताना महापौर लांडे म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे. आयुष्यभर कोणतेही पद त्यांनी घेतले नाही, तत्त्वाशी शेवटपर्यंत ठाम राहिले. त्यांचे कार्य मोलाचे असून ते यापुढील काळातही कायम राहावे, असे त्या म्हणाल्या. बाळासाहेबांना श्रध्दांजली वाहून आजची सभा २७ नोव्हेंबपर्यंत तहकूब करण्यात आल्याचे महापौरांनी जाहीर केले.