पालिकेच्या अनेक महत्त्वपूर्ण आस्थापनांचे संरक्षण करणाऱ्या सुरक्षा दलाला विशेष प्रशिक्षण आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिक सबळ करण्यात येईल. त्यासाठी एक हजार रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी जाहीर केले.
सुरक्षा दलाच्या ४७ व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी भांडूप संकुलातील सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पालिकेचे सुरक्षा दल दुबळे बनल्याचे वृत्त शुक्रवारच्या ‘मुंबई वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत पालिका आयुक्तांनी तातडीने एक हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा या कार्यक्रमात केली.
आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पालिकेचे सुरक्षा दल अधिक बळकट करण्यात येत आहे. २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात सुरक्षा दलासाठी १६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सुरक्षा दलाच्या सक्षमीकरणासाठी आर. डी. त्यागी समितीने सुचविलेल्या उपाययोजनांचा पालिका प्रशासन गंभीरपणे विचार करीत असून त्यांची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल, असेही कुंटे यांनी सांगितले.
हैदराबादमधील बॉम्बस्फोट आणि तत्पूर्वी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची मालिका लक्षात घेता मुंबई पोलिसांच्या सहकार्याने पालिका सुरक्षा दलातील सुमारे तीन हजार सुरक्षा रक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परिणामी पालिकेच्या मालमत्तांच्या सुरक्षिततेसह इतर संभाव्य घातपातविरोधी कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा दर सज्ज असेल, असेही ते म्हणाले. यावेळी सुरक्षा दलातर्फे करण्यात आलेल्या संचालनाचे निरीक्षक म्हणून लेफ्टनंट ए. के. उपाध्याय आणि उपप्रमुख अग्निशमन अधिकारी कुवेस्कर यांनी काम पाहिले. प्रमुख सुरक्षा अधिकारी अरुण वीर यांनी दलाच्या कार्याचा गेल्या ४६ वर्षांचा आढावा घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा