महापालिकेने नालेसफाईचे नियोजन कागदावर केले असले तरी प्रत्यक्षात काम न केल्याने शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत असल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचा परिणाम शहरातील खोल वस्त्यांमध्येही पावसाचे पाणी शिरले आहे.
पावसाळा सुरू होण्याच्या महिनाभरापूर्वीच शहरातील सर्व प्रमुख नाले, छोटय़ा नाल्या, भूमिगत गटारे सफाई अभियान राबविणे मनपाचे कर्तव्य आहे. मात्र, दरवर्षी मनपाच्या अधिकाऱ्यांना या कर्तव्याचा विसर पडत आहे. या वर्षीसुद्धा पावसाळा सुरू झाल्यानंतर मनपाने आता या अभियानाला सुरुवात केली आहे. शहरात महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी हे दोन प्रमुख मार्ग आहेत. परंतु, पावसाळ्यात या दोन्ही मार्गांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचत असल्याने सर्वसामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. रविवार ते बुधवारी पहाटेपर्यंत झालेल्या पावसाचे पाणी या दोन्ही रस्त्यांवर साचलेले बघायला मिळत आहे. आझाद बाग, लोकमान्य टिळक विद्यालय, जयंत टॉकीजला लागून एक मोठा नाला वाहतो. मनपाने भूमिगत गटार व रस्त्यांचे काम करतांना या नाल्यावरील पूल बंद केला होता. त्यामुळे नाल्यातील पाणी जाण्यास जागाच नव्हती. त्याचा परिणाम आता रस्त्यांवर पाणी साचले. ही बाब मनपाच्या लक्षात येताच पाऊस थांबल्यानंतर तातडीने हा पूल फोडण्यात आला. केवळ याच भागात नाही, तर सिटी हायस्कूल ते आझाद बागेपर्यंतची नाल्याची सफाई न केल्याने पावसाचे पाणी रस्त्यांवर साचले. ही बाब लक्षात येताच मनपाच्या अधिकाऱ्यांनी धावपळ सुरू केली. त्यामुळे आता कुठे हा नाला सफाई अभियान सुरू केले. कस्तुरबा मार्गावर कोतपल्लीवार पेट्रोल पंपाच्या बाजूचा नालाही साफ करण्यात आलेला नाही. त्यामुळे या नाल्याचे पाणी रस्त्यांवर येत असल्याने रस्त्यावर पाणी साचते. गिरनार चौक, गांधी चौक, सराफा मार्केट, रहमतनगर, महसूल कॉलनी, जगन्नाथबाबा नगर, वडगांव, सिव्हिल लाईन, तसेच नागपूर मार्गावरील रस्त्यांवर, तर कमला नेहरू मार्केट ते खोब्रागडे कॉम्प्लेक्सपर्यंत पाणी साचले असते.
केवळ मनपाच्या कामचुकारपणामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी मनपाच्या वतीने शहरात नालेसफाई अभियान राबविण्यात येते, असे नुसते भासवण्यात येते. प्रत्यक्षात काम काहीही नाही, असे एकंदरीच चित्र येथे बघायला मिळत आहे. शहरातील पावसाचे पाणी बाहेर जाण्यास जागा नसल्यानेच पाऊस आला तर शहरात पूर परिस्थिती निर्माण होते. केवळ चंद्रपूरच नाही, तर वरोरा, भद्रावती, राजुरा, मूल व ब्रम्हपुरी नगर पालिकेतही अशाच पद्धतीने कामभार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. भद्रावती नगर पालिकेने शिंदे पेट्रोल पंप ते नवीन बसस्थानक हा ठेंगे प्लॉटमधून जाणारा रस्ता खोदून नाली बांधल्याने बंद झाला आहे. त्याचा त्रास या परिसरातील नागरिकांनाही होत आहे. नाली खोदल्यानंतर पाइप न टाकता तशीच सोडून दिल्याने पावसाचे व नालीचे पाणी रस्त्यावर येत आहे. पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. ब्रम्हपुरीतही पावसाचे पाणी रस्त्यावर येते असल्याची गंभीर बाब समोर आली तर मूल, वरोरा शहरातही योग्य पद्धतीने सफाईची कामे झाली नसल्याने नाले व गटारातील सर्व पाणी रस्त्यांवर येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा