कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे हे आपल्या प्रभाग क्र. २३ मधील विकास कामांच्या फाईल्स मंजूर करीत नाहीत. नगरसेविकांशी ते अतिशय बेजबाबदारपणे वागतात, अशी तक्रार काँग्रेसच्या कल्याणमधील नगरसेविका वंदना गीध यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्य सचिव जयंतकुमार बाठिया, प्रधान सचिव श्रीकांत सिंग, राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना देण्यात आल्या आहेत. आपण आपल्या कार्यालयात आलेल्या कोणाही लोकप्रतिनिधीचा अवमान करीत नाहीत. महिला नगरसेविकांना सन्मानाने वागणूक देतो. त्यांच्या विकास कामांबाबतच्या तक्रारींची दखल घेतो, त्यामुळे करण्यात येत असलेले आरोप चुकीचे आहेत, असे यापूर्वीच सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
महिला नगरसेविकांवर पालिकेत होत असलेल्या अन्यायाबाबतच्या एक वर्तमानपत्रातील बातमीचे कात्रण या निवेदनाला जोडण्यात आले आहे.
पालिकेच्या सतरा वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक सत्ता शिवसेना-भाजपने उपभोगली आहे. या कालावधीत सोनवणे हे पालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत होते. आता ते आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे सत्ताधारी युतीमधील लोकप्रतिनिधींशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
 विकासकामांचा निधी वाटप करताना काँग्रेसचे एक-दोन नगरसेवक सोडले तर युतीच्या पदाधिकाऱ्यांना अधिक मान दिला जातो. प्रभागनिहाय आपण विकास कामांचा आर्थिक आढावा घेतल्यास ही बाब आपल्या निदर्शनास येईल, असे गीध यांनी निवेदनात म्हटले आहे.

Story img Loader