वक्तृत्व कलेचा लोकप्रतिनिधी होण्यासाठी महत्त्वाचा वाटा असतो, हा समज मुंबईच्या नगरसेवकांनी खोडून काढला आहे किंवा स्वत:च्या मतदारसंघात गमजा मारणारे नगरसेवक प्रत्यक्षात चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मूग गिळून गप्प बसतात. प्रजा फाऊंडेशनने एप्रिल ते मार्च या वर्षभरातील नगरसेवकांबाबत केलेल्या अभ्यासात १०७ म्हणजे सुमारे पन्नास टक्के नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात एकदाही चर्चेत भाग घेतला नसल्याचे स्पष्ट झाले तर नऊ नगरसेवकांनी कोणत्याही समिती, प्रभात पातळी येथे एकही प्रश्न उपस्थित केला नाही. चर्चेतून प्रश्न सोडवण्यात मागे असलेले नगरसेवक गुन्ह्य़ांमध्ये मात्र अधिक गुंतले आहेत. याच काळात तब्बल तीस नगरसेवकांवर नव्याने गुन्हे दाखल झाले आहेत.
दर महिन्यात किमान पाच वेळा पालिका सभागृहाच्या बैठका घेतल्या जातात. या सभेत प्रत्येक नगरसेवकाला पूर्वपरवानगीने प्रश्न विचारण्याची संधी मिळते. मात्र प्रजा फाऊंडेशनने माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहितीनुसार एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या काळात झालेल्या ७९ सभांमध्ये १०७ नगरसेवकांनी एकही प्रश्न विचारला नाही. ४५ नगरसेवकांनी केवळ एक प्रश्न विचारला. दोन ते दहा प्रश्न विचारणारे ५४ नगरसेवक होते तर त्यापेक्षा जास्त प्रश्न केवळ १४ नगरसेवकांनी विचारले. या १४ नगरसेवकांमध्ये गटनेत्यांची संख्या जास्त आहे.
मात्र प्रश्न विचारण्यावरून नगरसेवकांची गुणवत्ता ठरवली जाऊ शकत नाही, असे मत पालिका वर्तुळात व्यक्त होत आहे. काही वेळा गटनेत्यांकडून नगरसेवकांचे प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपात विचारले जातात तसेच काही वेळा विरोधी पक्षांच्या हातात आयते कोलीत मिळू नये म्हणून काही प्रश्न टाळले जातात. राजकीय कामकाजाचे स्वरूप लक्षात न घेता हे मूल्यमापन होत असल्याने त्याला विशेष महत्त्व देता येणार नाही, असे मत एका नगरसेवकाने व्यक्त केले. मात्र प्रभाग पातळीवरील समितीमध्येही काही नगरसेवकांना कोणतेही प्रश्न विचारावेसे वाटलेले नाहीत. नऊ नगरसेवकांनी वर्षभरात एकही प्रश्न विचारलेला नाही. २०१२ मधील निवडणुकांमधून पालिकेत आलेल्या या नगरसेवकांना दोन वर्षांच्या अनुभवानंतरही प्रश्न विचारण्यात गम्य वाटलेले नाही. याउलट आधीच्या वर्षांपेक्षा गेल्या वर्षी मुक्या नगरसेवकांची संख्या वाढली आहे. त्यातच प्रभाग पातळीवर झालेल्या ३०१ सभांमध्ये केवळ ९६५ म्हणजे प्रत्येक सभेत सरासरी केवळ तीन प्रश्न विचारले गेले.
गुन्ह्य़ांमध्ये मात्र वाढ
आधीच्या वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षभरात नगरसेवकांच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे. तब्बल तीन नगरसेवकांवर नव्याने गुन्हे दाखल झाले आहेत. २२० नगरसेवकांपैकी १६३ नगरसेवकांवर एकाही गुन्ह्य़ाची नोंद नाही. ३१ नगरसेवकांवर प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. दोन ते पाच गुन्हे दाखल झालेले १९ नगरसेवक आहेत. सहा ते दहा गुन्हे दाखल असलेले पाच तर दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले दोन नगरसेवक मुंबई पालिकेत आहेत. सर्वात जास्त गुन्हे नावावर असलेल्यांमध्ये राजू पेडणेकर (१२), अनंत नर (११) आणि रमेश कोरगावकर (८) यांचा समावेश असल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सुनीता यादव प्रथम
पालिकेच्या विविध सभांमध्ये विचारलेले प्रश्न, त्यांचा दर्जा, चर्चेतील सहभाग, प्रश्नांचे लोकांच्या दृष्टीने महत्त्व, निधीचा वापर, मतदारसंघातील लोकांचे मत, मतदारसंघातील कामे, गुन्हेगारी पाश्र्वभूमी आदी निकष लावून नगरसेवकांना दिलेल्या गुणांनुसार ‘आर’ दक्षिण विभागातील भाजपच्या नगरसेविका सुनीता यादव यांनी ८० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहल आंबेकर यांना प्रथम क्रमांक मिळाला होता. मात्र या वेळी त्या महापौर असल्याने त्यांचे मूल्यमापन केले गेले नाही.