सार्वजनिक रस्त्यावरील कचरा उचलण्याच्या कारणावरून काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे व त्यांच्या पतीने केलेल्या हल्ल्यात रवींद्र श्रीधर वडावराव (वय ५९) यांच्यासह दोघेजण जखमी झाले. जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाजवळ गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचे पती जॉन फुलारे हे ‘बाहुबली’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विरोधात यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. दुपारी पालिकेच्या परिमंडळ कार्यालयात रस्त्यावरील कचरा उचलण्याच्या कारणावरून कंत्राटदार कंपनीचे रवींद्र वडावराव यांच्याबरोबर वाद झाला होता. नंतर जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाजवळ त्याचे पर्यावसान भांडण तथा एकमेकांवरील हल्ल्यात झाले. फुलारे व त्यांच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात रवींद्र वडावराव व त्यांचे सहकारी किशोर गिते हे दोघे जखमी झाले. हा हल्ला जॉन फुलारे व त्यांचे साथीदार जीवन विलास शिंदे, सदाशिव शिंदे यांनी केल्याचे सांगण्यात आले. तर वडावराव यांच्याकडून झालेल्या मारहाणीत नगरसेविका श्रीदेवी फुलारे या जखमी झाल्याची नोंद पोलिसात झाली आहे.

Story img Loader