पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधीजींच्या पावलावर पाऊल टाकून ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा करताच मुंबई महापालिकेने स्वच्छतेचा संकल्प सोडला. पालिका प्रशासनाच्या हातात हात घालून नगरसेवकांनीही हाती झाडूू घेत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली होती. स्वच्छतेच्या मोहिमेतील सहभागाबद्दल नगरसेवकांचे नागरिक कौतुकही करीत होते. पण आता बहुतांश नगरसेवकांचा उत्साह मावळला असून मुंबईत या अभियानाचीच एैशीतैशी होऊ लागली आहे.
गेल्या वर्षी गांधी जयंतीचे औचित्य साधून मुंबईत छोटय़ा-मोठय़ा सर्वच नेत्यांनी हाती झाडू घेत स्वच्छ रस्ते आणखी लख्ख करीत आपापली छायाचित्रे काढून घेतले. वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे भिरभिरत चित्रण करीत असल्याने या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना तर स्वच्छतेचे भरतेच आले होते. नगरसेवकांनीही आपापल्या प्रभागांमध्ये स्वच्छतेसाठी वेळापत्रक लावून घेतले. पालिका, तसेच खासगी कामगार आणि आपल्या कार्यकर्त्यांसह नगरसेवकाचा ताफा विभागामध्ये साफसफाई करू लागले होते. मात्र नगरसेवकांचा हा उत्साह आता मावळला आहे.
‘भारत स्वच्छता अभियान’ची घोषणा झाल्यानंतर नगरसेवक मोठय़ा उत्साहाने सफाई मोहिमेत सहभागी होत होते. त्यामुळे सफाई कामगारांचाही उत्साह वाढत होता. नगरसेवकच आपल्यासोबत काम करीत असल्यामुळे सफाई कामगारही आपली कामे इमानेइतबारे करीत होते. पण हळूहळू नगरसेवक स्वच्छता मोहिमेस येईनासे झाले आणि त्यांचे कार्यकर्तेही गायब झाले. नगरसेवकांनी स्वच्छता अभियानातून अलगद अंग काढून घेतल्याने कामगारामध्ये पूर्वीची आळसवृत्ती जागृत झाली आहे, असे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील एका अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. परिणामी मुंबईवर होणाऱ्या सफाईवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे.
आजही दर शुक्रवारी पालिका कार्यालयांची कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता करण्यात येत आहे. पण काही कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी नगरसेवकांच्याच पावलावर पाऊल टाकून साफसफाईसाठी टाळाटाळ करू लागले आहेत. पालिकेच्या कामाचे निमित्त करून काही अधिकारी-कर्मचारी शुक्रवारी सफाईच्या वेळी कार्यालयातून काढता पाय घेत असल्याचेही आढळून आले आहे. कर्मचारी दररोज कार्यालयात सफाई करतात. मग दर शुक्रवारी कार्यालय सुटल्यानंतर थांबून आणखी वेगळी सफाई कशाला करायची अशी चर्चा पालिका कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे हळूहळू पालिका कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत दर शुक्रवारी केल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहिमेत शिथिलता येऊ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा