‘नागरी कामे करदात्यांच्या पैशांतून होत असतात. या कामांची उद्घाटने करून आणि त्याची जाहिरात करून श्रेय कसले लाटता?’ हा सवाल कुणा सामाजिक कार्यकर्त्यांने नागरिकांच्या सभेत केलेला नाही. मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या एका नगरसेवकाने गुरुवारी भर सभागृहात सर्वच लोकप्रतिनिधींना उद्देशून हा प्रश्न केला आणि संपूर्ण सभागृह एकदम अवाक् झाले. जनतेकडून सातत्याने उपस्थित केल्या जाणाऱ्या या मुद्दय़ाला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक बगल देत असतात. परंतु एका लोकप्रतिनिधीचे हा मुद्दा जाहीरपणे काढल्याने अन्य नगरसेवकांना काय बोलावे हेच सुचेनासे झाले.
त्याचे असे झाले : मालाडमधील भाजप नगरसेवक विनोद शेलार, ज्ञानमूर्ती शर्मा आणि राम बारोट यांच्या प्रभागांमधील पाच रस्त्यांचे भूमिपूजन काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. मात्र संजय निरुपम यांनी बुधवारी या रस्त्यांच्या भूमिपूजनाचा घाट पुन्हा घातला. आचारसंहिता जारी झाल्याने आता भूमिपूजन करता येणार नाही, असे पोलिसांनी त्यांना कळविले होते. मात्र तरीही त्यांनी सकाळपासून भूमिपूजन सुरू केले. राणीसती मार्गावर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विनोद शेलार यांनी संजय निरुपम यांनी भूमिपूजन करू नये, अशी विनंती केली. मात्र तरीही कार्यक्रम सुरू झाला. शेलार कार्यक्रमाचे मोबाइलमध्ये चित्रण करीत होते. निरुपम यांनी त्यांचा मोबाइल हिस्कावून घेतला आणि रस्तावर आपटला. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांने भूमिपूजनाचा नारळ शेलार यांना फेकून मारला. मात्र ते सुदैवाने बचावले. या मुद्दय़ाला शेलार यांनी गुरुवारी पालिका सभागृहात वाचा फोडताच भाजप नगरसेवकांनी गोंधळ घातला.
नगरसेवकांनी महापालिकेच्या निधीमध्ये केलेल्या कामांचे श्रेय खासदार आणि आमदार लाटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यापुढे त्यांना पालिकेच्या कार्यक्रमास केवळ पाहुणे म्हणून बोलवावे. त्यांना व्यासपीठावर स्थान देऊ, नये अशी मागणी दिलीप पटेल, ज्ञानमूर्ती शर्मा यांनी केली. खासदार, आमदार आणि नगरसेवकांमध्ये प्रशासन भांडण लावत असल्याचा आरोप करून संध्या दोषी यांनी कार्यक्रमांच्या बॅनर्सबद्दल मार्गदर्शक तत्वे जारी करण्याची मागणी केली. मूळ मुद्दा सोडून ही सारी चर्चा होत असतानाच ‘ही सर्व कामे करदात्यांच्या पैशातून होत आहेत. मग उद्घाटने करून त्याचे श्रेय कसले लाटता?’, असा थेट सवाल काँग्रेसचे नोशीर मेहता यांनी केल्याने सर्वच नगरसेवक अवाक झाले.

Story img Loader