पिंपरी पालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अजित पवार यांच्यासमोर तक्रारींचा अक्षरश: पाऊस पाडला. सत्ता असूनही प्रभागातील कामे होत नाहीत, हाच नगरसेवकांच्या तक्रारीचा समान मुद्दा होता. याशिवाय, शहरातील कामे संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत विकासकामांचा वेग वाढवण्याची सूचना अजितदादांनी आयुक्तांना केली.
पिंपरी पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची अजितदादांच्या उपस्थितीत चिंचवडला बैठक झाली. अ‍ॅटो क्लस्टरला झालेल्या बैठकीत सिटीसेंटर, नदीसुधार प्रकल्प, पाणीपुरवठा, उड्डाणपूल, गृहप्रकल्प, बीआरटीएस, बसथांबे, रस्तेविकास, रेडझोन, डीयर पार्क, मोकळी मैदाने, आरक्षित जागा, डेंग्यू आदी प्रमुख विषयांवर यावेळी चर्चा झाली. महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी व अधिकारी वर्ग तसेच महापौर मोहिनी लांडे, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, पक्षनेते मंगला कदम, उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आदी उपस्थित होते.
प्रभागातील कामे होत नाहीत, अधिकारी दाद देत नाहीत, अशा तक्रारी प्रामुख्याने नगरसेवकांनी केल्या. ज्यांना बैठकीत बोलण्याची संधी मिळाली नाही, त्यांनी निवेदनाद्वारे पवार यांच्याकडे समस्या मांडली. यावेळी बोलताना अजितदादांनी नव्या गावांसह शहराचा सर्वागीण विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. अर्थसंकल्पात तरतुदी आहेत. मात्र, त्यानुसार कामे होत नाहीत, कामांचा वेग अतिशय संथ का आहे, याविषयी त्यांनी आयुक्तांकडे विचारणा केली. कामे करताना दर्जा सांभाळा, जकातदर निश्चित करताना उद्योजकांचाही विचार करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. सायन्स पार्क दोन महिन्यात सुरू करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

Story img Loader