कल्याण डोंबिवली महापालिकेतील एका खासगी कंत्राटदाराला भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या मनसे नगरसेवकाची छायाचित्रे  प्रसिद्ध होऊनही त्यावर कारवाई होत नसल्याच्या भावनेने नाराजी पसरत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नगरसेवकाच्या या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
महापालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व येथील गणेशवाडी परिसरातील एका जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम वेळेवर पूर्ण न केल्याबद्दल राज ठाकरे यांच्या मनसेचे नगरसेवक नितीन निकम यांनी पाटील नावाच्या कंत्राटदारास बोलावून घेऊन जाब विचारला आणि जमलेल्या लोकांसमक्ष त्याला मारहाण केली, असे सांगण्यात येते. या प्रसंगाची काही छायाचित्रेही प्रसृत झाली. जलवाहिनीची दुरुस्ती वेळेवर न झाल्याने गेल्या चारपाच दिवसांपासून परिसरात पाणीटंचाई जाणवू लागली होती, तरीदेखील महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार एकमेकांकडे बोटे दाखवत टोलवाटोलवी करत होते. त्यांना समज देऊनही दुरुस्तीचे काम वेळेत न केल्याने अखेर मनसे स्टाईलने योग्य ती समज देण्यात आली, असा पवित्रा घेत मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या कृतीचे समर्थन केले असले, तरी नगरसेवकाच्या या कृतीमुळे राज ठाकरे नाराज झाले आहेत. एका ज्येष्ठ नागरिकावर अशा तऱ्हेने हात उगारणे ही मनसे स्टाईल असूच शकत नाही, असे राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता या नगरसेवकावर पक्षातर्फे काय कारवाई होणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
हा प्रकार घडला तेव्हा महापालिकेचे काही अधिकारीही तेथे हजर होते, असे समजते.