कल्याण-डोंबिवली पालिकेत अनेक कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून शिक्षेची शिफारस करण्याऐवजी पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक या दोषी अधिकाऱ्यांना कसे पाठीशी घालतात याचे चित्र प्रदर्शन नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वाना पाहावयास मिळाले.
दोन वर्षांपूर्वी पालिकेच्या ‘ह’ प्रभागात नळजोडणी घोटाळा घडला आहे. या घोटाळ्याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत पालिकेचे उपअभियंता विजय पाटील हे प्रथम क्रमांकाचे आरोपी आहेत. पाटील यांच्यासह अन्य तीन आरोपींवर कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
पाटील यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेत मंजुरीसाठी आणला होता. इतर वेळी चौकशीला काही क्षणात मंजुरी देणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाटील यांच्या विभागीय चौकशीला कडाडून विरोध करीत हा प्रस्ताव फेटाळण्यात धन्यता मानली. शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळण्यास विरोध दर्शविला. प्रभाग अधिकारी गणेश बोराडे यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक नगरसेवक खासगीत नाराज आहेत. एका दक्ष नागरिकाने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांच्या तक्रारी केल्या आहेत. असे असताना बोराडे यांना साहाय्यक आयुक्त करण्याचा प्रस्ताव शिवसेना, मनसेने पुरेशी चर्चा न करताच मंजूर केला. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र बोराडे यांच्या नियुक्तीला कडाडून विरोध केला. नगरसेविका कोमल निग्रे यांना जिवे मारण्याची धमकी देणारा सफाई कामगार तथा फेरीवाल्यांचा पथक प्रमुख दिलीप ऊर्फ बुवा भंडारी याला निलंबित करण्याची जोरदार मागणी मनसेच्या नगरसेविका, सेनेच्या कल्याणी पाटील यांनी करूनही मनसेतील महासभेतील दुफळीमुळे भंडारी यांना निलंबित करण्याचा निर्णय झाला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा