कल्याणमधील बारावे येथील रखडलेल्या विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेवर स्वातंत्र्य दिनी भूमिपूजन करून उपकेंद्राच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात येईल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाने गेल्या महिन्यात कल्याणमधील शिवसेनेच्या नगरसेवकांना दिले होते. हे आश्वासन न पाळल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या कल्याणमधील नगरसेवकांनी विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेवर शुक्रवारी सकाळपासून उपोषण सुरू केले आहे.
सात वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली पालिकेने विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेसाठी नाममात्र दराने भूखंड दिला आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यापीठाने तातडीने हे उपक्रेंद्र सुरू करावे म्हणून पालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक प्रयत्नशील आहेत. मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनीही या प्रकरणी शासन, विद्यापीठाकडे पत्रव्यवहार केला आहे. गेल्या महिन्यात कल्याणमधील शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र पाटील, सचिन बासरे, कैलास शिंदे, सुनील वायले व इतर नगरसेवक मुंबई विद्यापीठात कल्याणमधील उपकेंद्र सुरू करा, अन्यथा पालिकेच्या ताब्यात हस्तांतरित केलेली जागा वर्ग करा या मागणीसाठी गेले होते. त्या वेळी विद्यापीठ प्रशासनाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आमची अकृषीक (एन.ए.) परवान्याची नस्ती रखडून ठेवली असल्याची माहिती दिली होती. ही नस्ती मिळाल्यानंतर तातडीने उपकेंद्राचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाने शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले होते. तोपर्यंत कोणतेही आंदोलन किंवा जागा परत घेण्याची कार्यवाही करू नये, अशी विनंती प्रशासनाने केली होती.
गेल्या दीड महिन्यात विद्यापीठाला बांधकाम उभारणीसाठीची आवश्यक ती कागदपत्रे मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांचे रखडलेले काम पूर्ण झाले. त्यामुळे स्वातंत्र्य दिनी उपकेंद्राच्या भूमिपूजनाचा सोहळा होईल अशी अपेक्षा नगरसेवकांना वाटत होती. पण कासवगतीने वाटचाल करीत असलेल्या विद्यापीठ प्रशासनाने आमचा अपेक्षाभंग केला. महाराष्ट्र शासनही या सगळ्या प्रकाराला जबाबदार असल्याची टीका करीत रवींद्र पाटील, सचिन बासरे, सुनील वायले व इतरांनी विद्यापीठ व शासनाचा निषेध करण्यासाठी कल्याणमधील उपकेंद्राच्या जागेवर उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणामुळे पोलिसांसह विद्यापीठ प्रशासनाची धावपळ उडाली आहे. विशेष म्हणजे मूळ कल्याणकर असलेले, बिर्ला महाविद्यालयात अनेक वर्षे प्राचार्यपद भूषवलेले डॉ. नरेश चंद्र विद्यापीठात प्र-कुलगुरू आहेत. तरीही कल्याणबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत शिवसेनेच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यापुढे भूखंड पालिकेच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करण्यासाठी हालचाली केल्या जातील, असे पाटील म्हणाले.
विद्यापीठ उपकेंद्रासाठी नगरसेवकांचे उपोषण
कल्याणमधील बारावे येथील रखडलेल्या विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेवर स्वातंत्र्य दिनी भूमिपूजन करून उपकेंद्राच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात येईल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाने गेल्या महिन्यात कल्याणमधील शिवसेनेच्या नगरसेवकांना दिले होते.
First published on: 16-08-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporators hunger strike for university sub centre in kalyan