ठाणे शहरातील नागरी समस्या तसेच शहर विकास विभागातील अनागोंदी कारभाराविषयी अनेकदा पत्रव्यवहार करूनही न्याय मिळत नसल्यामुळे काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या कार्यालयाबाहेर सोमवारी धरणे आंदोलन केले. महापालिका प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले. सुमारे तीन तास नगरसेवक आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून बसले होते.
ठाणे महापालिकेतील आयुक्त कार्यालयाबाहेर काँग्रेस नगरसेवक संजय घाडीगावकर, मालती पाटील यांच्यासह भरत पडवळ आंदोलनासाठी बसले होते. ठाणे शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची माहिती, बायोमेट्रिक सर्वेक्षण, शहर विकास विभागातील अनागोंदी कारभाराविषयी अनेकदा पत्रव्यवहार करूनही तसेच सर्वसाधारण सभेतही या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही. आपले पत्र संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहे, अशीच उत्तरे आयुक्त कार्यालयामार्फत मिळत होती. त्यामुळे आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केल्याची माहिती संजय घाडीगावकर यांनी दिली. तसेच आयुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader