महापालिका आणि बेस्ट कर्जबाजारी झाल्या तरी चालेल पण जास्तीतजास्त गोष्टी आपल्याला फुकटात कशा मिळतील याची मोर्चेबांधणी सोडायची नाही, असा कोडगेपणा नगरसेवकांच्या अंगवळणी पडत चालला आहे. बेस्ट उपक्रम सध्या तोटय़ात सुरू आहे. हा तोटा कमी कसा होईल, तो फायद्यात कसा येईल यावर उपाय शोधणे हे खरे तर नगरसेवकांचे काम. परंतु ते राहिले बाजूला. प्रत्यक्षात बेस्टच्या तोटय़ाला मुख्यत्वे कारणीभूत ठरलेल्या वातानुकूलित बसेसमधून फुकट प्रवास करण्याची मागणी या नगरसेवकांनी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली. विशेष म्हणजे एरवी छोटय़ा-मोठय़ा कामांचे प्रस्ताव रोखण्यासाठी आरडाओरड करणारे विरोधक यावेळी मात्र बस पासवर डोळा ठेऊन गप्प बसले.
बेस्टची आर्थिक परिस्थिती नाजूक बनल्यामुळे गेल्या दिवाळीच्या सुमारास कर्मचाऱ्यांना वेतन देणेही अवघड बनले होते. मात्र पालिकेने केलेल्या मदतीमुळे बेस्ट प्रशासनाला मार्ग काढता आला. डबघाईला आलेल्या स्थितीमुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देता येणार नाही, अशी भूमिका बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी घेतली. कामगार संघटना आणि दस्तुरखुद्द महापौरांनी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची विनंती बेस्ट प्रशासनाला केली होती. परंतु आर्थिक स्थिती गंभीर असल्यामुळे बोनसची मागणी मान्य झाली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांची दिवाळी कोरडीच गेली. बेस्टची आर्थिक स्थिती नाजूक बनल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे सहन केले.
वातानुकूलित बसगाडय़ांमुळे उपक्रमाच्या तोटय़ात वाढ होत आहे. त्यामुळे हा पांढरा हत्ती बाळगणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. वातानुकूलित बसगाडय़ा टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या विचारात बेस्ट उपक्रम असतानाच या पांढऱ्या हत्तीतून मोफत सफर करण्याची इच्छा सत्ताधारी नगरसेवकांना झाली आहे. वातानुकूलित बसचे पास नगरसेवकांना द्यावेत, अशी मागणी शिवसेना नगरसेवक अरुण दुधवडकर यांनी बेस्ट समितीच्या मंगळवारच्या बैठकीत केली. त्यास शिवसेनेच्याच रंजन चौधरी यांनी पाठिंबा दिला. तर दस्तुरखुद्द बेस्ट समिती अध्यक्ष नाना आंबोले यांनीही अनुकूलता दर्शविली. सत्ताधारी आणि प्रशासनावर कोरडे ओढण्याची एकही संधी न सोडणारे बेस्ट समितीमधील विरोधक यावेळी मात्र पासवर डोळा ठेऊन गप्प बसून राहिले होते.महापालिकेकडून जीवन विम्याची मागणी करणाऱ्या नगरसेवकांनी आता वातानुकूलित बसचा पासची मागणी करीत डबघाईला आलेल्या बेस्टला तोटय़ात लोटण्याचाच प्रयत्न सुरू केल्याची चर्चा बेस्ट वर्तुळात सुरू झाली आहे.
नगरसेवकांचा फुकटेपणाचा हव्यास!
महापालिका आणि बेस्ट कर्जबाजारी झाल्या तरी चालेल पण जास्तीतजास्त गोष्टी आपल्याला फुकटात कशा मिळतील याची मोर्चेबांधणी सोडायची नाही, असा कोडगेपणा नगरसेवकांच्या अंगवळणी पडत चालला आहे. बेस्ट उपक्रम सध्या तोटय़ात सुरू आहे.
First published on: 06-06-2013 at 12:06 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporators wants free facility