सामान्य जनतेचे प्रश्न सुटत नसतील तर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष, तसेच अधिकाऱ्यांना शहरात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीसह सर्व नगरसेवकांनी आज कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिला.
स्व. वसंतदादा पाटील सभागृहात नगराध्यक्ष सुरेखा राक्षे यांच्या उपस्थितीत सभा पार पडलेल्या बैठकीत माजी खासदार स्व. शंकरराव काळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेत मांडलेल्या ३१ ठरावांपैकी चार ठराव नामंजूर करण्यात आले. तसेच विविध कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांची संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी टाकून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी सर्व नगरसेवकांनी मागणी केली.
सतत चार तास आरोप-प्रत्यारोपाच्या खडाजंगीत सभेचे वातावरण तापले. यामुळे कोण काय बोलतो, विचारतो व प्रश्नाची उत्तरे देतो हेच अनेक वेळा समजत नव्हते. यावेळी नगराध्यक्षा राक्षे यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. नगरपालिका निवडणूक पार पडल्यापासून एकही प्रश्न सुटला नसून आरोग्याच्या प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केल्याचा आरोप करून उपनगराध्यक्षा मीनल खांबेकर यांनी चर्चेस तोंड फोडले. जनविकास आघाडीचे प्रतोद डॉ. अजय गर्जे यांनी अधिकारी चुकीची माहिती देताना उडवाउडवीची उत्तरे देतात. तसेच नियमानुसार काम होत नसल्याची खंत व्यक्त केली.   

Story img Loader