नोटरी आधारे जागेचा फेर करून नमुना क्रमांक ८ देण्यास दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिंतूर तालुक्यातील वरुडचा (नृसिंह)ग्रामसेवक संतोष दशरथ पांडे याला शुक्रवारी पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पांडे याला अटक करण्यात आली.
वरुड येथील अर्जुन भाऊराव चव्हाण यांनी गावातील पंडित डोंबे यांच्याकडून ४० बाय ३५ फूट आकाराची मोकळी जागा २० हजार रुपयांत खरेदी केली. बाँडवर खरेदीबाबत नोटरी करून घेतली. नोटरीच्या आधारे ग्रामपंचायतीने नोंद घेऊन नमुना क्रमांक ८ देण्याची मागणी ग्रामसेवक पांडेकडे केली असता त्याने या कामासाठी दीड हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही असे त्याने सांगितले होते. चव्हाण यांनी लाचलुचपत विभागाकडे पांडेविरोधात तक्रार नोंदवली. त्यानुसार जिंतूर येथे सापळा रचून लाच घेताना त्याला पकडण्यात आले.

Story img Loader