पोलीस कोठडीतील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वाशी पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक अप्पाराव दराडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले. दोन महिन्यांपूर्वी याच पोलीस ठाण्याचा निरीक्षक अविनाश बुधवंत यास २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक झाली होती.
तालुक्यातील पारगाव येथील गोदावरी नामदेव गाढवे, त्यांचा पती नामदेव गाढवे, मुले हनुमंत गाढवे व बाळू गाढवे, जावई सुग्रीव चाटे यांच्याविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात हाणामारीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपींना १६ ऑगस्टला अटक होऊन न्यायालयासमोर नेले असता, १९ ऑगस्टपर्यंत त्यांची पोलीस कोठडीत रवानगी झाली. सर्व आरोपी कोठडीत असताना गोदावरीबाई यांनी उपनिरीक्षक दराडे याची भेट घेऊन अटकेतील नातेवाईकांना जामीन मिळवून देण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली. त्यावरून दराडे याने मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. रविवारी दराडे याने पाच हजार रुपये घेतले. सोमवारी पुन्हा पाच हजार रुपये घेऊन या. तुमच्या लोकांची जामिनावर सुटका करण्यासाठी मदत करतो, असे त्याने म्हटले होते.
गोदावरी गाढवे यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदविली. त्यानुसार वाशी पोलीस ठाण्यात सापळा लावण्यात आला. गाढवे हिच्याकडून लाच घेताना ठाण्यातच दराडे याला लाचलुचपत अधिकाऱ्यांनी पकडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा