भ्रष्टाचार हा मोठा सामाजिक प्रश्न असून इ-गव्हर्नन्सच्या माध्यमातून भ्रष्टाचारावर पूर्णपणे नियंत्रण राखता येऊ शकते. त्यासाठी समाजातील सर्व घटकांपर्यंत संगणक सेवा पोहचण्याची गरज आहे. त्यासाठी नव्या सरकारने डिजीटल इंडिया योजनेची आखणी केली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी ठाण्यात केले.
रामभाऊ म्हाळगी व्याख्यान मालेच्या उद्घाटनासाठी सुरेश प्रभू ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिराच्या क्रीडा संकुलामध्ये आले होते. यावेळी व्यासपीठावर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे विनय सहस्रबुद्धे, आ. संजय केळकर उपस्थित होते. उद्याचा भारत या विषयावर सुरेश प्रभू यांनी उपस्थितांशी संवाद साधला. उद्याच्या भारताचा विचार करताना वर्तमान भारत आणि कालचा भारत यांचेही भान राखण्याची गरज आहे. कालचा भारत अर्थदृष्टय़ा समृद्ध तर होताच शिवाय विचार, कृती आणि आचरणानेसुद्धा आधुनिक असाच होता. आजच्या भारतामध्ये मात्र विपरीत परिस्थिती आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणामध्ये भारताचा अनेक देशांच्या खाली क्रमांक लागत असून काही ठिकाणी तर आपला क्रमांक बांगलादेशच्याही खाली लागत असून ही अत्यंत शरमेची बाबा आहे. उद्याचा भारत घडवण्यासाठी औद्योगिक सत्ता बनण्याची गरज आहे. मेक इन इंडियासारख्या उपक्रमातून ते साध्य होऊ शकेल. भारतातील लोह जपानमध्ये निर्यात करून त्यापासून तयार यंत्राच्या खरेदीने भारताने जपानला मोठे केले मात्र भारत मागेच राहिला. त्यामुळे उत्पादन हेच साधन बनण्याची गरज आहे. लोकसंख्येच्या तुलनेत मोठा असणाऱ्या चीनने अवघ्या काही वर्षांमध्ये प्रचंड मोठी प्रगती केली असून अमेरिकेला स्पर्धा करणारी अर्थव्यवस्था म्हणून चीन ओळखले जाऊ लागले आहे. देशाच्या लोकसंख्येवर विकासाचा दर अवलंबून नसतो हे चीनने दाखवून दिले आहे. चीन अंतर्गत कर्जामध्ये बुडाला असून दरडोई उत्पन्नाच्या दुप्पट कर्ज प्रत्येक व्यक्तीवर आहे. भारतामध्ये उपजत व्यावसायिकता आहे आणि त्याच्या जोरावर उद्याचा भारत घडवला तर अधुनिक भारत घडू शकेल, असे सुरेश प्रभू म्हणाले.