गोंदिया जिल्हा परिषदेने घेतलेल्या कंत्राटी ग्रामसेवक भरतीत प्रकल्पग्रस्त उमेदवारांची निवड यादी नुकतीच प्रकाशित झाली. मात्र, चार दिवसानंतर ही निवड चुकीने झाली आहे. त्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराची निवड झाली असल्याचा दूरध्वनी उपमुख्य कार्यपालन अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी संबंधित उमेदवाराला केला. मात्र, नव्याने प्रसिद्ध झालेली यादी आली नसल्याने या भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप अकोल्याचे संदीप नागे यांनी केला आहे.
सविस्तर असे की, जिल्हा परिषदेच्या वतीने कंत्राटी ग्रामसेवक भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यात प्रवर्ग अनु.जमाती (महिला,) प्रवर्ग भ.ज. (क), प्रवर्ग भ.ज.(क) प्रकल्पग्रस्त व प्रवर्ग भ.ज.(ड) यासाठी प्रत्येकी १ पद राखीव ठेवण्यात आले. यासाठी ९ जूनला परीक्षा घेण्यात आली. यानंतर निवड यादी व प्रतीक्षा यादी नेटवर प्रसिद्ध करण्यात आली. प्रवर्ग भ.ज.(क)साठी नागा रेड्डी भूमत्र बोडखे यांची निवड करण्यात आली, तर प्रतीक्षा यादीत चंद्रशेखर सहादेव हलाले यांना ठेवण्यात आले. प्रवर्ग भ.ज.(क) प्रकल्पग्रस्त निवड यादीत संदीप शंकरराव नागे यांचे नाव प्रकाशित करण्यात आले. संदीप नागे यांचे एकमेव नाव असल्याने त्यांची निवड निश्चित समजली गेली. मात्र, अचानक तीन दिवसांपूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्या कार्यालयातून संदीप नागे यांच्या मोबाईलवर फोन आला. दरम्यान, तुमची निवड चुकीने झाली असल्याचे सांगण्यात आले. त्याऐवजी चंद्रशेखर हलाले यांची निवड झाल्याचे सांगितले. यामुळे नागे यांना धक्का बसला. त्यांनी सरळ गोंदिया जिल्हा परिषद कार्यालय गाठले. त्यावेळी त्यांना चंद्रशेखर हलाले हे प्रकल्पग्रस्त आहेत; परंतु आमच्या कार्यालयातून चुकी झाली असल्याने त्यांना प्रकल्पग्रस्त दाखविण्यात आले नाही. ते प्रकल्पग्रस्त असल्याने आता तुमच्याऐवजी चंद्रशेखर हलाले यांची निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी साबळे बाहेर असल्याने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अन्यायग्रस्त नागे यांनी तुमची निवड चुकीने झाली असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी चंद्रशेखर हलाले यांचा अर्ज पाहिला असता त्यात प्रकल्पग्रस्त म्हणून नोंद नव्हती. मात्र, प्रकल्पग्रस्तांचा दाखला जोडला असल्याचे आढळले. याचाच अर्थ, हलाले यांनी अर्ज सादर केल्याने ते प्रकल्पग्रस्त कसे? त्यांचा जोडलेला प्रकल्पग्रस्ताचा अर्ज बनावट असण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश िशदे यांनीही कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळेच निवड झालेल्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आल्याचे सांगून त्यांना हाकलून लावले. हलाले यांची निवड योग्य होती तर मग सुधारित यादी नेटवर का प्रकाशित करण्यात आली नाही, असाही प्रश्न संदीप नागे यांनी उपस्थित केला आहे. मात्र, त्याचे उत्तर एकही अधिकारी देऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी अन्यायग्रस्त उमेदवार संदीप नागे २९ जूनला जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेले असता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे निवेदन न स्वीकारता तुमची निवड चुकीमुळे झाली असून हलाले यांचीच निवड योग्य असल्याचे सांगितले. यानंतर नागे यांचे वडील काही पत्रकारांसह जिल्हा परिषदेत गेले. उपमुख्य कार्यापालन अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्या कार्यालयातील लिपीक रहांगडाले यांच्याकडे जाऊन त्यांनी हलाले यांच्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र, त्यांना संबंधित कागदपत्र सामान्य प्रशासन विभागात गेले असल्याचे सांगण्यात आले.
सामान्य प्रशासन विभागातील संबंधित विभागात चौकशी केली असता त्यांच्याकडे कागदपत्र आले नाहीत. फक्त अहवाल आला असल्याचे सांगण्यात आले. यावरून हलाले यांचे कागदपत्र देण्यात अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुणे येथे असल्याचे सांगितले. आपल्यावर अन्याय झाल्याचे पाहून अन्यायग्रस्त नागे न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. याबाबतीत संदीप नागे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली निवड योग्य असून आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे. यासाठी आपण न्यायालयात जाणार असून वेळप्रसंगी आत्मदहन करणार असल्याचेही सांगितले. दरम्यान, या भरती प्रकरणात एका ज्येष्ठ राजकीय व्यक्तीने हस्तक्षेप केल्यानेच संदीप नागे यांची निवड रद्द ठरवून चंद्रशेखर हलाले यांची निवड केल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा