* राष्ट्रवादी-शिवसेनेत प्रतिष्ठेची लढाई
* कंत्राटी कामांची टक्केवारी चर्चेत
* ग्लास हाऊस, बावखळेश्वर मंदिर वादात
भ्रष्टाचार विरहित महापालिकेचा नारा देत अडीच वर्षांपूर्वी नवी मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता प्रस्थापित करणारे ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांना सध्या वाशीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेना तसेच काँग्रेस या विरोधी पक्षांकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या कडव्या टीकेला तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेतील कंत्राटी कामांमध्ये उघडपणे टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा टोक गाठू लागला असतानाच बेलापूर येथील रेतीबंदर तसेच महापे येथील दगडखाणीभोवती असलेल्या औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर अतिक्रमणाप्रकरणी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने पोटनिवडणुकीत या गैरव्यवहारांची चर्चाच अधिक रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबईतील कचरा सफाईचे सुमारे २३६ कोटी रुपयांच्या कंत्राटाचा मुद्दाही या निवडणुकीत गाजू लागला असून सत्ताधारी पक्षाचे नेते या आरोपांना कसे सामोरे जातात, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील वर्चस्वाला आव्हान देत नवी मंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने वाशीनगरात येत्या आठ एप्रिल रोजी पोटनिवडणुकीचे बिगूल वाजले आहे.   
वादग्रस्त कंत्राटी कामे
नवी मुंबई महापालिकेतील अभियंता विभागातील कोटय़वधी रुपयांच्या कंत्राटांमध्ये सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे सध्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांसाठी अडचणीची ठरू लागली आहेत. नेरुळ येथील वंडर्स पार्कच्या शुभारंभापूर्वी या भागात विद्युत वाहिनी टाकण्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचे दिलेले कंत्राट वादात सापडले आहे. निविदाप्रक्रियेत एकमेव कंत्राटदार असतानाही त्याच कंत्राटदाराला हे कंत्राट बहाल करून आयुक्त भास्कर वानखेडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यापूर्वी कचरा वाहतुकीचे सुमारे २३६ कोटी रुपयांचे कंत्राट वादात सापडले असून महापालिकेतील अभियंता विभागातील महत्त्वाच्या कामांमध्ये उघडपणे टक्केवारी सुरू झाल्याची चर्चाही आता रंगली आहे. ‘रोडमॅप’ या टोपणनावाने कंत्राटी कामांमध्ये सुरूझालेली टक्केवारीची वसुली सध्या महापालिका वर्तुळात चर्चेत असून या वसुलीमुळे अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकारीही सध्या हैराण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. पोटनिवडणुकीत शिवसेना तसेच काँग्रेस पक्षाचे नेते स्थायी समितीमधील अंडरस्टॅडिंग विषयी जाहीरपणे आरोप करू लागले असून ‘माझ्या नगरसेवकांना सुपारीचा खांडसुद्धा खाऊ देणार नाही’, अशी भाषा करणारे पालकमंत्री विरोधकांच्या भ्रष्टाचाराच्या या आरोपांना कसे उत्तर देतात याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
ग्लास हाऊस, बावखळेश्वर मंदिर वादात
महापालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप ताजे असताना वाशीतील सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी बेलापूर येथील रेतीबंदर येथे उभे राहिलेले ग्लास हाऊस आणि एमआयडीसी येथील दगडखाणींच्या जागेवरील बावखळेश्वर मंदिराचे अतिक्रमण झाल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्याने हे मुद्देही पोटनिवडणुकीतील प्रचाराचा केंद्रिबदू ठरले आहेत. विशेष म्हणजे, पालकमंत्र्यांविरोधात अगदी जाहीरपणे आरोप होत असताना त्यांचे समर्थक मात्र याविषयी मूग गिळून असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात विरोधकांकडून आरोपांच्या फैरी झाडण्यात येत असल्या तरी आम्ही आरोपांना विकासकामांचा प्रचार करून उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीतील एका ज्येष्ठ नगरसेवकाने वृत्तान्तशी बोलताना दिली. गणेश नाईक यांनी नवी मुंबईचा कसा विकास केला आहे हे सर्वाना ठाऊक आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या फुटकळ आरोपांना नवी मुंबईकर भीक घालणार नाहीत, असा दावाही या नगरसेवकाने केला.