राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचाराची मालिकाच चालविली आहे. यामुळे सामान्य जनतेमध्ये भ्रमनिरास झाला आहे. अशा परिस्थितीत सामान्य जनतेशी बांधिलकी असलेल्या शेतकरी-कामगार पक्षाने रस्त्यांवर उतरून संघर्षांची तयारी ठेवली पाहिजे, असे आवाहन शेकापचे आमदार भाई जयंत पाटील यांनी रविवारी येथे बोलताना केले.
कोल्हापूर जिल्हा शेतकरी-कामगार पक्षाच्या वतीने आमदार जयंत पाटील यांच्या सत्काराचे आयोजन संकल्पसिद्धी कार्यालयामध्ये करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांच्या हस्ते आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला.    
तत्पूर्वी ताराराणी पुतळा येथून रॅली काढण्यात आली. पक्षाचे लाल झेंडे घेतलेले शेकडो कार्यकर्ते घोषणा देत सहभागी झाले होते. शहराच्या मुख्य मार्गावर फिरून रॅली संकल्पसिद्धी कार्यालयात आल्यावर तेथे मुख्य कार्यक्रम पार पडला. माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, शेकापमध्ये व्यक्तिगत स्वरूपाच्या सत्काराची पद्धत नाही. मात्र आमदार जयंत पाटील व त्यांच्या चार पिढय़ांनी पक्षकार्य व पक्ष बांधणी कशी करावी, याचा आदर्श घालून दिला आहे. विरोधक बलाढय़ असला तरी न डगमगता जिद्दीने पक्ष कार्य केले की त्याची वाढ कशी होते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. कार्यकर्त्यांनी या घटनेपासून बोध घेऊन पक्ष विस्तारासाठी सतर्क राहावे. तरुणांना शेकापमध्ये येण्याचे आवाहन त्यांनी केले.    
या वेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचेही भाषण झाले. पक्षाचे शहर सचिव बाबुराव कदम यांनी स्वागत केले. भारत पाटील यांनी प्रास्ताविक केले. भोगावती कारखान्याचे संचालक केरबा पाटील यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा