भारतीय जनता पक्षाने २५ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्य़ात बूथ विस्ताराची योजना राबवणार आहे. या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यात काँग्रेस आघाडी सरकारने जनतेच्या योजनांत केलेला भ्रष्टाचार लोकांपुढे मांडावा, असे आवाहन पक्षाचे प्रदेश चिटणीस सुनील बडे यांनी केले.
बूथ विस्तार योजनेची माहिती देण्यासाठी बडे यांच्या उपस्थितीत आज पक्ष कार्यालयात विस्तारक व बूथप्रमुखांची बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते. बूथप्रमुख व समितीने दौरा करून आपल्या मतदारांची नावे व छायाचित्र मतदारयादीत आहेत की नाहीत, याची खात्री करावी व नावे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. २८ रोजी भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा मुंडे-पालवे नगरच्या दौ-यावर येत असून त्यानिमित्ताने भव्य मेळावा आयोजित केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
पक्षसंघटनेच्या माध्यमातूनच माणसे मोठी होतात, त्यासाठी संघटना वाढली पाहिजे व पक्षाने जुन्यांसह नव्यांनाही बरोबर घेऊन काम केले पाहिजे, सर्वाना समान न्याय मिळावा, अशी अपेक्षा खासदार दिलीप गांधी यांनी या वेळी  व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष आमदार राम शिंदे यांनी जिल्ह्य़ाच्या उत्तर भागात पक्षसंघटनावाढीची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. स्थानिक रहिवासी असलेल्यांनाच बूथप्रमुख म्हणून नियुक्त केले जाईल व बूथप्रमुख नियुक्त करताना स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही दिली. बूथ समितीच्या माध्यमातूनच आपण खासदार व आमदार झालो, असे गांधी व शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी जिल्हा सरचिटणीस भानुदास बेरड, जगन्नाथ निंबाळकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader