कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिवहन उपक्रमाने बुधवारी मोठय़ा दिमाखात २० नव्या मीडी बस प्रवासी वाहतुकीसाठी खुल्या केल्या. या नवीन बस परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होताच या बसेस म्हणजे उपक्रमात घुसलेला ‘पांढरा हत्ती’ असल्याची टीका आता दबक्या आवाजात सुरु झाली आहे. मीडी बसमधून बसून व उभे असे जेमतेम ३५ ते ४० प्रवासी प्रवास करू शकतात. यासाठी इंधन, कर्मचारी पगार, टायर, दुरूस्ती, देखभालीचा खर्च मोठय़ा बसप्रमाणे कायम राहणार आहे. त्यामुळे केवळ ‘करून दाखविले’ एवढेच दाखविण्यासाठी हा लोकार्पणाचा सोहळा परिवहन सभापती अशोक गोडबोले यांनी उरकला असल्याची चर्चा आता रंगली आहे.  
विशेष म्हणजे, मीडी बस लोकार्पण सोहळ्याला आमदार विनोद तावडे, आमदार एकनाथ शिंदे या दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी पाठ फिरविल्याने या सोहळ्याच्या उत्सवी रूपावर विरजण पडले. मीडी बस शहरातील गल्लीबोळात येजा करू शकतील ही मात्र या प्रवासी सेवेची सकारात्मक बाजू आहे. असे असले तरी या बसची धावसंख्या, लागणारा कर्मचारी, इंधन यासाठी मोठय़ा बसप्रमाणेच खर्च येणार आहे. सध्याच्या घडीस परिवहन उपक्रमाला प्रत्येक किलोमीटर मागे सुमारे १२ ते १५ रूपये तोटा होत आहे. परिवहन उपक्रमात चालक, वाहकांची वानवा आहे. त्यामुळे नवीन मीडी बससाठी कर्मचारी कोठून उपलब्ध करून देणार असा प्रश्न उपक्रमातील अधिकाऱ्यांकडून खासगीत केला जात आहे.
माजी सभापती राजन सामंत, रमेश कोनकर यांच्या कारकिर्दीत  सहा ते सात वर्षांपूर्वी नवीन बस खरेदी करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर मंजुरीसाठी पाठविला होता. त्यामधील नवीन मिडी बस आणण्यात आल्या आहेत. उपक्रमात योग्य नियोजन नसल्याने हा सात वर्षांचा कालावधी बस आणण्यात गेला असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी उपक्रमात २० मीडी, ३० मोठय़ा आणि ३० भाडेतत्वावरील बसचा ताफा होता. भाडेतत्वावरील बस उपक्रमाने बंद केल्या. उपलब्ध बसचे आर्युमान आता घटले आहे. त्यामुळे टेकू देऊन या बस चालविल्या जात आहेत. घरत यांनी परिवहनचा पदभार सोडल्यापासून उपक्रम आणखी गाळात गेला आहे. तीन ते चार वर्षांपासून उपक्रमाचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे उपक्रमातील सुत्राने सांगितले. आता उपक्रमात एकूण १४५ बसचा ताफा आहे. त्यामधील ४० गाडया भंगारात निघाल्या आहेत. ३० बस ब्रेकडाऊन मुळे बंद असतात. फक्त ६० ते ७० बस सुमारे पाच ते सहा लाख प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. आस्थापना खर्च दीड कोटीहून अधिक झाला आहे. यामध्ये तोटा जास्त आणि नफा कमी असे सध्याचे उपक्रमाचे चित्र आहे. त्यामुळे तोटय़ात असलेला उपक्रम आणखी गाळात अडकणार आहे. नवीन मिडी बस हा केवळ देखावा ठरणार असल्याचे आणि सभापती गोडबोले यांनी ‘करून दाखविलेचा’ झेंडा फडकविण्यासाठी हे लोकार्पण केले असल्याचे उपक्रमात बोलले जात आहे.

संगणकीकरण मोडित
आमदार विनोद तावडे यांच्या हस्ते उपक्रमाच्या संगणकीकरणाचे उद्घाटन गेले काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते. या माध्यमातून तिकीट देणे, पैसे स्वीकारणे ही कामे संगणकीकरणातून होत होती. या यंत्रणेला ‘सीआयआयआर’ने मान्यता दिली होती. टीएमसी, बीएमसी, एनएमएनटीत हे मॉडेल सुरु असताना केडीएमटीने मात्र ते मोडित काढले आहे.

Story img Loader