कुत्रा पाळताना त्याला दिवसभरात काही तरी खायला टाकणे हा आपला रिवाज. बऱ्यापैकी घर बांधलं तर त्याच्या रक्षणासाठी कुत्रा पाळण्याची पद्धत जुनीच. आता रक्षणासोबतच घरातला सदस्य अशीही श्वानाची ओळख झाली आहे. त्याच्यासाठी बाजारात आलेल्या पौष्टिक अन्नाची (खाद्य) किंमत सामान्यांना चक्रावून टाकणारी आहे. किमान २२० रुपये ते ४०० रुपये किलोपर्यंत त्याचे भाव आहेत, म्हणजे माणसांच्या खाद्यापेक्षाही महाग आणि अन्नसुरक्षा कायद्यामुळे गरिबांना गहू, तांदूळ ज्या दरात मिळणार आहे, त्या तुलनेत तर अतिमहाग..!
नांदेड शहरात भाग्यनगर रस्त्यावर अशोकनगरच्या हद्दीत ‘पेट केअर’ नावाचे दालन नव्याने सुरू असून पाळीव श्वानांसाठी विविध कंपन्यांनी तयार केलेले खाद्य, औषध तसेच इतर साहित्य (पट्टा, चोकचेन, बॉडी बेल्ट, साबणी, शाम्पू) या दालनात उपलब्ध केले आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा योजनेला नांदेड जिल्ह्य़ात प्रारंभ झाला. गरिबांना नाममात्र दरात दरमहा गहू व तांदूळ देण्याची ही योजना लागू होत असतानाच, माणसांच्या अन्नापेक्षा कुत्र्याचे अन्न किती महाग आहे, तेही चित्र सहज समोर आले. टाटांची नॅनो अवघ्या लाखात मिळणार असे जाहीर झाले तेव्हा ‘नॅनो’पेक्षा बैलगाडी महाग असल्याचे वास्तव समोर आले होते. आता अन्नसुरक्षा योजेनत मिळणारे धान्यच नव्हे, तर खुल्या बाजारात गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी आदी जीवनाश्यक वस्तूंचे सध्या असलेल्या दरापेक्षाही श्वानांच्या खाद्याचे दर खूपच जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नांदेड शहरात अनेकांनी वेगवेगळ्या विदेशी जातीचे श्वान पाळले आहेत. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्यासारखे अधिकारी तसेच माजी मंत्री सूर्यकांता पाटील श्वानप्रेमी आहेत. श्वानांना घरच्या अन्नाखेरीज जे काही द्यावे लागते ते नांदेडमध्ये एकाच दुकानात उपलब्ध आहे. हे महागडे अन्न नियमित खरेदी करणारे काही श्वान मालक नांदेडमध्ये आहेत, असे ‘पेट केअर’चे संचालक विजय सुंडगे यांनी सांगितले.
माणसांच्या खाद्यातील तांदळाच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सर्वात महागडा तांदूळ म्हणजे बासमती. तो शंभर ते सव्वाशे किलो दराने मिळत असताना, श्वानाचे खाद्य त्याहून किती तरी महाग असल्याची बाब चकीत करणारी ठरली. ‘पाळीव कुत्रा सुदृढ व्हावा व आनंदी राहावा’ या साठी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न बाजारात आणले गेले. श्वानांची पचनक्षमता, तसेच त्याच्या परिपूर्ण वाढीसाठी आवश्यक घटक एकाच अन्नातून मिळावेत, या साठी पेडिग्री, न्युट्रिपेट हे उत्पादन उपलब्ध झाल्याचे सुंडगे यांनी सांगितले.
चार-पाचशे रुपये किलो!
श्वानाच्या पेडिग्री या खाद्याच्या ३ किलोच्या पॅक चा भाव ५०० रुपयांपर्यंत, तर रॉयल कॅनन या आणखी एका खाद्याच्या ४ किलोच्या पॅकचा भाव आहे १५०० रुपये. म्हणजे पावणेचारशे रुपये किलो! एक किलोचा पॅक घेतला तर सरळ चारशे रुपये मोजावे लागतात. न्युट्रिपेट हा आणखी एक खाद्यप्रकार. त्याच्या ३ किलोच्या पॅकचा दर आहे, ४८० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा