परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात बुधवारी खासगी व्यापाऱ्यांमार्फत कापूस खरेदीस प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी प्रतिक्विंटल ४ हजार २३१ रुपये कापसास दर मिळाला. जवळपास १ हजार ९०० क्विंटल कापसाची खरेदी झाली.
मराठवाडय़ात कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या परभणी बाजार समितीमध्ये बुधवारी पहिल्यांदाच कापूस खरेदी सुरू करण्यात आली. मार्केट यार्डात सर्वप्रथम आलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा फेटा बांधून बाजार समितीच्या संचालक मंडळाने सत्कार केला. ४ हजार २३१ रुपये दराने १ हजार ९०० क्विंटल कापसाची खरेदी खासगी व्यापाऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी कापूस ओला न आणता स्वच्छ स्वरूपात वेगवेगळ्या जातीचा स्वतंत्रपणे करून विक्रीस आणावा, तसेच कापूस खरेदीदारांनी २४ तासांत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची रक्कम देण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना सभापती आमदार संजय जाधव यांनी या वेळी दिल्या. शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीतून केवळ हमालीची रक्कम ६ रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे कपात करण्यात येणार असून वाहन प्रवेश, वजन, तुलाई, वराईची रक्कम, ट्रक व आयशर वाहन वगळता बंद करण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी बाजार समितीच्या बांधा समितीकडे कराव्यात, असे आवाहनही आमदार जाधव यांनी केले. उपसभापती आनंद भरोसे, संचालक स्वराजसिंह परिहार, सोपान अवचार, गणेश घाटगे, रामेश्वर रेंगे, दिलीप अवचार, सुभाष काळे यांच्यासह कापूस व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पद्माकर कंदी आदी व्यापारी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाजार समितीचे   सचिव सुरेश तळणीकर यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा