गतवर्षी कापसाला ७ हजारांचा भाव मिळाल्याने या वर्षी जिल्हय़ातील कापसाचे क्षेत्र वाढले. मात्र, भारतीय कापूस निगमतर्फे केवळ जवळा बाजारमध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली. मात्र भाव केवळ ३ हजार ९०० रुपये एवढाच आहे. खासगी व्यापाऱ्यांनी शुक्रवारी ४ हजार ५० रुपये कापसाला भाव दिला. जिल्हय़ात आतापर्यंत ६ हजार ८२६ क्विंटल कापूस खरेदी झाली. कापसाला मिळणारा कमी भाव, पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. मात्र, कापसाला मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
कापूस एकाधिकार सुरू होण्यापूर्वी हिंगोली शहरात सुमारे १८ जिनिंग प्रेसिंग जूनपर्यंत मोठय़ा दिमाखात चालत. कापसाची व्यापारपेठ अशी हिंगोलीची सर्वदूर ओळख होती. मात्र, कापूस एकाधिकार योजनेमुळे ती ओळख पुसून गेली. हिंगोलीत कॉटन मार्केटमध्ये पूर्वी नोव्हेंबर महिन्यात कापासाची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असे शुक्रवारी  तेथे केवळ ५० वाहने होती. त्या वाहनात सुमारे २५० क्विंटल कापूस विक्रीसाठी आला होता. खासगी व्यापाऱ्यांनी ४ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल भाव दिला, तर कापूस पणन महासंघाचा ३ हजार ९०० रुपये भाव दिला.
हिंगोलीत नर्मदेश्वर जिनिंगमध्ये २२ नोव्हेंबर रोजी कापूस खरेदीला सुरुवात झाली. १० दिवसांत केवळ २७ क्विंटल कापसाची खरेदी झाली. खासगी व्यापाऱ्यांकडून आतापर्यंत ५७६, तर कापूस पणन महासंघाने आतापर्यंत २७ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. जिल्हय़ात आतापर्यंत ६ हजार ८२६ क्विंटल कापूस खरेदी झाली.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cotton gets 4000 rate buying is 6000 quentel