रुग्णांच्या सीटी स्कॅन चाचण्यांसारखी कामे भविष्यात मोबाईल फोनएवढय़ा छोटय़ा उपकरणाद्वारे करता येणार आहेत. इतकेच नव्हे तर या चाचण्यांचे निष्कर्षही तत्काळ मिळवता येतील. अतिवेगवान ‘एग्झास्केल काँप्युटिंग’ क्षेत्रात आता देशात संशोधन होणार असून, त्याची एका क्रांतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. याद्वारे केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर इतर क्षेत्रांतही संगणकाच्या साहाय्याने केली जाणारी कामे कमीत कमी वेळात आणि अधिक अचूकतेने करता येणार आहेत.
एग्झास्केल सुपरकाँप्युटर (१० हजार पेटाफ्लॉप) देशात बनविण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरूवात झाली आहे. २०१७ सालापर्यंत या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा आहे. एग्झाफ्लॉप सुपरकाँम्पुटर अस्तित्वात येईल तेव्हा सध्याच्या ‘टेराफ्लॉप’ काँप्युटरचा आकार मोबाईल फोनएवढा लहान असेल. ‘एनव्हिडिया’ कंपनी आणि ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी)- दिल्ली’ या संस्थांतर्फे दिल्लीत एग्झास्केल काँप्युटिंगमधील संशोधनासाठी प्रयोगशाळा स्थापन करत असून सध्या तिची उभारणी सुरू आहे. या क्षेत्रातील भावी आव्हाने जाणून घेऊन प्रयोगशाळेच्या कामकाजाची आखणी होत आहे.  एग्झास्केल तंत्रज्ञान कमी खर्चिक करणे हे आव्हान आहे. सुपरकाँप्युटरच्या वापरासाठी मोठय़ा प्रमाणावर वीज खर्च होते. या समस्यांची उत्तरे शोधणे हे या संशोधनाचे उद्दिष्टय़ असणार आहे. कंपनीचे दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल धुपर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, कंपनीच्या ‘टेस्ला हाय परफॉर्मन्स जीपीयू काँप्युटिंग’ विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सुमित गुप्ता, डॉ. सुबोध कुमार, जया पानवलकर, मनीश बाली या वेळी उपस्थित होते.